रानडुकरांपासून पीक संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू
गोंडपीपरी तालुक्यातील गोजोली येथील घटना
गोंडपीपरी : रानडुकरांपासून धानपीक संरक्षणासाठी लावलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना काल दि.१४ रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. हि घटना तालुक्यातील गोजोली येथे घडली. मृतक शेतकऱ्याचे नाव साईनाथ मेश्राम आहे. सदर घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली.
गोंडपीपरी तालुक्यात जास्तीतजास्त शेतकरीवर्ग असून बहुतांश भाग जंगल परिसराने व्यापला आहे. त्यामुळे जंगली जनावरांचा नेहमीच वावर असतो गेल्या काही वर्षांपासून रानडुक्करांचा एवढा हैदोस वाढला आहे की, रात्रभर राखणी करून सुद्धा पीक नशिबी पडत नाही त्यासाठी शेतकरी कंटाळून विद्युत करंटचा वापर करतात आणि लावताना चूक झाल्यास प्रसंगी मृत्युला पण सामोरे जावे लागते. दिवसेंदिवस अशा घटनेत वाढ झालेली असून काल पहाटेला तालुक्यातील गोजोली येथील साईनाथ दाऊ मेश्राम वय ४३ या शेतकऱ्याचा धानपिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. याआधी घरातील वडीलभाऊ आणि आता याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा हादरा बसला आहे. त्याच्या मागे वृद्ध आई वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा मोठा आप्त परिवार असून कुटुंबासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटना स्थळी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी विशाल अमराज, वन विभागाकडून वनरक्षक एस.एस.नैताम व पोलीस विभागाकडून तपास अधिकारी अनिल चांदोरे पोलीस उप निरीक्षक हे पुढील तपास करीत आहेत.