गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जनजागृतीवर भर द्या – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
जिनिंग मध्ये स्वच्छता व साफसफाई ठेवा
चंद्रपूर दि. 12 नोव्हेंबर : कृषी विभागाने गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती शेतकरी मीत्र व कृषी सहाय्यकांमार्फत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिल्या.
पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प क्रापसॅप अंतर्गत कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळी नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. उदय पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कापूस पिकाचे सरासरी पेरणी क्षेत्र 1 लक्ष 83 हजार 949 आहे. सद्यस्थितीत कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. यावर आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप व निंबोळी अर्काचा वापर करावा व कृषी विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे शेतकऱ्यांनी पालन करावे. गुलाबी बोंडअळी मुळे जिल्ह्यात विशेषत: राजुरा व कोरपना तालुक्यात कापूस या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी आहेत. तरी तेथे किती प्रादुर्भाव झाला, त्याविषयीचे सर्वेक्षण करावे, जेणेकरून त्यावर पुढील उपाययोजना करण्याचे नियोजन करता येईल.
जिल्ह्यातील जिनिंग प्रेस मध्ये स्वच्छता व साफसफाई ठेवावी व फेरोमेन सापळे लावावे. गोडाउन मध्ये ठेवण्यात आलेल्या कापसाच्या तपासणीसाठी टीम तयार करून तपासणी मोहीम जिल्हाभरात राबवावी असे निर्देश देखील त्यांनी कृषी विभागाला दिले.
यावेळी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणाकरिता केलेली कार्यवाही, शेदंरी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची कारणे व व्यवस्थापन तसेच कृषी विभागामार्फत बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या माहितीचे सादरीकरण कृषी विभागातर्फे करण्यात आले.
बैठकीला संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी , कृषी पर्यवेक्षक ,केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे प्रतिनिधी, कृषी संशोधन केंद्राचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.