जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा
चंद्रपूर दि.12 नोव्हेंबर: प्राचीन काळापासून आपल्या जीवनात आयुर्वेदाला महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी जयंतीला राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा करण्यात येतो. याचेच निमित्त साधून जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवन सभागृहात पाचवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस व धन्वंतरी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात कोरोना प्रतिबंधक करिता आयुष चिकित्सा पद्धतीचे महत्त्व तसेच आयुष वैद्यकीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे प्रतिपादन केले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात या निमित्त्याने आयुष गार्डन तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात आयुष औषधांची उपलब्धता करण्याचे सूतोवाच केले.
या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. गजानन राऊत, सहाय्यक डॉ.प्रकाश साठे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद्र कन्नाके, आयुर्वेद व्यासपीठ अध्यक्ष डॉ. राजीव धानोरकर, आरोग्य भारती चंद्रपूरचे अध्यक्ष उमेश चांडक, श्रीमती विमलादेवी आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. अभिषेक देशमुख, निमाचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत सरबेरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी कोरोना योध्दयांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.भट्टाचार्य यांनी केले.