आवाळपुर येथील मांदाडे कुंटुबातीली आई आणि मुलींचे होते सर्व स्तरांवर अभिनंदन
नितीन शेंडे/ आवाळपुर
: मनात जिद्द असली की कोणतीही गोष्ट असाध्य नाही. शिक्षण कमी असल्याची खंत बाळगणाऱ्या एका आईने आपल्या जुळ्या मुलींसह इयत्ता बारावीची परीक्षा दिली. आणि ती चक्क ५८ टक्के गुणांसह उत्तीर्ण करून आपणही ‘सूपर मॉम’ असल्याचे दाखवून दिले. या सुपर मॉमने इयत्ता दहावीची परीक्षासुद्धा आपल्या जुळ्या मुलींसोबत दिली होती. आणि तब्बल ७१.२० टक्के गुण घेऊन बाजी मारली होती.
कल्पना देविदास मांदाडे रा. आवाळपूर ता. कोरपना असे या सूपर मॉमचे नाव आहे. त्यांना सौंदर्या आणि ऐश्वर्या या दोन जुळ्या मुली आहे. त्यांनी जिवती तालुक्यातील शेणगाव येथील प्रियदर्शिनी विद्यालयातून नियमित विद्यार्थी म्हणून बारावीची परीक्षा दिली. तर मुलगी सौंदर्याने चंद्रपूर येथील एफ.ई.एस. गर्ल्स कनिष्ठ महाविद्यालयातून नियमित विद्यार्थी म्हणून परीक्षा दिली. तिने ६५ टक्के गुण पटकावले तर आणि ऐश्वर्याने प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा ता. कोरपना येथून परीक्षा दिली. तिला ५५ टक्के गुण मिळाले. या आई-मुलींचे यश परिसरात कौतुकाचा विषय ठरले आहे.
कल्पना देविदास मांदाडे यांना समाजसेवेची आवड आहे. समाजाचे ऋण फेडायचे हाच त्यामागचा हेतू. समाजात वावरताना आपले शिक्षण कमी आहे. ही सल मात्र त्यांच्या मनाला बोचत होती. त्या नित्यनेमाने जुळ्या मुलींचा अभ्यास घेत. अशातच न कळत त्यांच्यातही शिक्षणाची आवड निर्माण झाली. आणि आता शाळेत जायचेच हा विचार पक्का झाला. आणि या सूपर मोमचा नवा प्रवास सुरू झाला. गॅप सर्टिफिकेट काढून इयत्ता दहावीत प्रवेश घेतला. मुलीही दहावीत गेल्या होत्या. मुलींसोबत आता आईचाही अभ्यास सुरू झाला. मुलींसोबत कल्पना मांदाडे यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण केली.
सौंदर्याने ८० टक्के तर ऐश्वर्याने ७० टक्के गुण घेतले होते, तर या सूपर मॉमने तब्बल ७१.२० टक्के गुण घेऊन आपणही कमी नसल्याचे दाखवून दिले होते. यावर्षी या तिन्ही मायलेकी नियमित विद्यार्थिनी म्हणून बारावीच्या परीक्षेला बसल्या. आणि तिघीही या परीक्षेतसुद्धा उत्तीर्ण झाल्या. कल्पना मांदाडे यांनी केवळ परीक्षा उत्तीर्ण केली नाही, तर शिक्षणाची आवड मनातच ठेवणाºया महिलांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.