‘आयसीयु’मधील कोविड रुग्णांशी व्हिडिओ कॉलींगद्वारे साधा संवाद ; आरोग्य यंत्रणेचा नाविण्यपुर्ण उपक्रम
चंद्रपूर, दि. 10 नोव्हेंबर : कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्याने बाधित झालेल्या गंभीर रुग्णांना उपचारासाठी अतिदक्षता विभागातील विशेष कक्षात भरती करण्यात येते. याठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रवेश नसतो, त्यामुळे त्यांचा रुग्णाशी संपर्क तुटतो. त्या रुग्णाबाबत डॉक्टरांकडून माहिती मिळायला वेळ लागत असल्याने व माहिती मिळाली तरी समाधान न झाल्याने मनात हुरहुर राहत होती. खरेच आपल्या रुग्णाची तब्येत व्यवस्थीत आहे का, योग्य औषधोपचार मिळतो काय, जेवणाची सोय वेळेवर होते का, यासारख्या नानाविध शंका आप्तस्वकीयांची मानसिक शांती भंग करीत होत्या. त्यात कोणी उपचाराला प्रतिसाद दिला नाही किंवा काही अनुचित घडले तर डॉक्टरांनी पर्यायाने शासनाने रुग्णांकडे लक्ष दिले नाही अशी देखील ओरड होत होती. विशेषत: उपचारात दिरंगाई, उपचार योग्य नसणे, काळजी घेतली जात नाही असे आरोप नातेवाईकांकडून सातत्याने होत असत. नातेवाईक वॉर्डाबाहेर असल्याने त्यांना वॉर्डातील वस्तुस्थितीही माहिती होत नसे.
कोविड रूग्णासंदर्भात वरील अडचण दूर करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने व्हिडिओ कॉलींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. या सुविधेमुळे नातेवाईकांना प्रत्यक्ष रुग्णांशी दृष्यप्रणालीद्वारे संवाद साधता येतो. रुग्णांची स्थिती प्रत्यक्षदर्शी बघता येते सोबतच उपचाराविषयी व प्रशासनाने करून दिलेल्या उपचाराच्या सुविधेबद्दल प्रत्यक्षात रुग्णाकडूनच माहिती घेता आल्याने मनातील हुरहुर कमी होऊन नातेवाईक व रुग्ण दोघांना आंतरिक समाधान मिळू लागले आहे. तसेच प्रत्येक बाबीवर वेळोवेळी स्पष्टीकरण देण्याचा रुग्णालय प्रशासनाचा भार देखील कमी झाला असून उपचार करणाऱ्या डॉक्टरांवरील मानसीक दडपणसुद्धा कमी झाले आहे. यामुळे एकंदरीत प्रशासकीय यंत्रणेवरील ताण कमी होण्यास नक्कीच मदत झाली आहे.
कोरोना रुग्णांशी व्हिडीओ कॉलींगद्वारे संवाद साधण्याची ही सुविधा कोविड रुग्णालयासमोरील समुपदेशन केंद्रात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दररोज संध्याकाळी 4 ते 5 या वेळेत उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 10 ते 15 मिनिटे अगोदर रुग्णालयाच्या मदत केंद्रावर नोंदणी करणे आवश्यक राहील. यावेळी संबंधीतांना रुग्णाचे नातेवाईक असल्याचे पटवून द्यावे लागेल. यासाठी आधार कार्ड किंवा इतर कोणताही नातेसंबंधाची खात्री होईल असा पुरावा आवश्यक आहे. या केंद्रावर नियुक्त सामाजिक वैद्यकीय अधिक्षक हे रुग्णांच्या नातेवाईकांना व्हिडीओ कॉल लावून रुग्णांशी बोलण्याची व त्यांना मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. व्हिडीओ कॉल करणाऱ्या नातेवाईकांच्या नोंदी 1 नोव्हेंबरपासून घेण्यात आल्या असून त्यानुसार आजपर्यंत 110 वेळा या सुविधेचा लाभ घेण्यात आला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत व्हिडीओ कॉलींगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले होते. याची तात्काळ दखल घेवून अधिष्ठाता डॉ. हुमणे यांनी व्हिडिओ कॉलींगची सुविधा दुसऱ्या दिवसापासूनच सुरू केली आहे.
या मदत केंद्रावर आज प्रत्यक्ष पाहणी केली असता सौ. अस्मिता रंगारी, प्रशांत जोध, प्रविण रामटेके यांनी व्हिडिओ कॉलींग सुविधेचा लाभ घेत आपापल्या कोविड रुग्ण नातेवाईकांशी आस्थेने चौकशी केल्याचे दिसून आले. तब्येत कशी आहे, छातीत काही त्रास होतो का, जेवण केले काय, आराम आहे का, आता तब्येत कशी वाटत आहे, ऑक्सीजन मिळते का, यासारखे प्रश्न विचारून त्यांनी रुग्णाच्या सद्यस्थितीबाबत अद्यावत माहिती जाणून घेतली. रुग्णासोबत संवादासाठी रुग्णालय प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या या व्हिडीओ कॉलींग सुविधेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.