हिंगणघाट येथे 50 लाखाची भर दिवसा ढवळ्या धाड़सी चोरी
हिंगणघाट (अनंता वायसे) : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील कोठारी कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या श्रीमती ताराबाई गोविंदराव हुरकट यांच्या घरी आज भर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास धाडसी चोरी झाली. यात चोरट्यांनी रोख रकमेसह अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. सविस्तर वृत्त असे की श्रीमती ताराबाई हुरकट या कोठारी कॉम्प्लेक्स मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहतात. त्या मुलगा आणि सून यांच्यासोबत आज सकाळी बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान पाळतीवर असलेल्या अज्ञात चोरट्यांनी याचा फायदा घेत त्यांच्या घराची समोरच्या दरवाज्याची कडी तोडून घरात प्रवेश केला . चोरट्यांनी घरातील आलमारी तोडून आल्मारीतील साडेसातशे ग्रॅम सोन्याचे दागिने, दहा लाख 80 हजार किमतीचे डायमंडचे कडे , दोन किलो चांदी अंदाजे रक्कम दोन लाख चाळीस हजार आणि पंधरा हजार रुपये नगदी रक्कम घेऊन लंपास झाले. या ए ऐवजाची एकूण किंमत 50 ते 60 लाख असल्याचे कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आमदार समीर कुणावर, पोलीस अधीक्षक व सहाय्यक पोलीस अधीक्षक यांनी हुरकट यांच्या घरी भेट दिली.पोलिसांनी या चोरीच्या घटनेचा गुन्हा नोंदविला आहे.भर दुपारी घडलेल्या या चोरीमुळे शहरात चिंता वाढली आहे.सणासुदीच्या दिवसात चोरट्यांनी हैदोस घालणे सुरु केल्याने पोलिसांसमोर आवाहन उभे झाले आहे .* शहरात नवीन ठाणेदार म्हणून भानुदास पिदुरकर यांनी कार्यभार घेतला आहे. या चोरीने शहरात असुरक्षतीचे वातावरण तयार झाले आहे. तोंडावर दिवाळी सारखे सण येऊन ठेपल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे नवीन ठाणेदार या चोरट्यांवर कसा बंदोबस्त लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे