पदवीधर मतदारांसाठी विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित

0
620

पदवीधर मतदारांसाठी विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित

नागपूर, दि.5 नोव्हेंबर : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर  विभाग पदवीधर  मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. दरम्यान आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने पदवीधर मतदारांना येणा-या अडचणीसंदर्भात तक्रार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

सार्वत्रिक निवडणुकीवेळी असणारी आदर्श निवडणूक आचारसंहितेप्रमाणेच नागपूर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, कोणत्याही व्यक्ती अथवा गटाकडून त्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जावी. कोविड महामारीच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने प्रचारसभा घेण्यास प्रतिबंध घातला आहे.

            पदवीधर मतदारसंघाच्या घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार आजपासून नामनिर्देशपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुषंगाने नागपूर विभागात पदवीधर मतदारसंघात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा कक्षामार्फत कामकाज होणार आहे. त्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त मिलींद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

      आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मतदारांची कुठलीही तक्रार असल्यास मतदारसंघातील मतदारांना विभागस्तरावरील तक्रार निवारण कक्षाकडे करता येणार आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे 0712-2542518 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here