चंद्रपूरचे सात नागरिक पहलगाम मधून सुखरूप परतले
आमदार किशोर जोरगेवार यांच्या तत्पर प्रयत्नांना यश ; बल्लारपूर रेल्वे स्थानकावर स्वागत
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या चंद्रपूरच्या सात नागरिकांना अखेर सुखरूप परत आणण्यात यश आले आहे. या संपूर्ण प्रयत्नात आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष योगदान राहिले.
चंद्रपूर मधील नागीनाबग वार्ड येथील अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, वर्षा गाडीवान आणि तेजस्विनी गाडीवान हे सात नागरिक पहलगाममध्ये अडकले होते. दहशतवादी हल्ल्याच्या जवळपासच ते थांबलेले होते. माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ या कुटुंबीयांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली आणि त्यांना धीर दिला.
यानंतर, आमदार जोरगेवार यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके तसेच जम्मू-काश्मीर प्रशासनाशी थेट संपर्क साधून संबंधित कुटुंबीयांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत मागितली. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे स्थानिक प्रशासनाने तातडीने या नागरिकांशी संपर्क साधला आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. या सर्व हालचालींनंतर, आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने या सात नागरिकांना घरी परत आणण्यासाठी रेल्वेचे तिकीट उपलब्ध करून देण्यात आले. आज दुपारी १२ वाजता हे सर्वजण बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वे स्थानकावर भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व कुटुंबीयांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे विशेष आभार मानले. हे कुटुंब सुरक्षित घरी पोहोचेपर्यंत मी स्वतः सतत प्रशासनाशी संपर्कात होतो. त्यांच्या घरी सुखरूप परत येणं हेच माझं कर्तव्य होतं एक दोन दिवसात आणखी काही नागरिक चंद्रपुरात पोहोचणार असून आपण सतत संपर्कात असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आमदार जोरगेवार यांनी दाखवलेली तत्परता व संवेदनशीलता विशेष उल्लेखनीय ठरली आहे.