रक्तदात्यांच्या रूपानं वाहिली आदरांजली : महामानवाच्या १३४व्या जयंतीनिमित्त राजुरात भव्य रक्तदान शिबिर
राजुरा :“जातीपेक्षा माणुसकी मोठी” हा संदेश समाजमनात खोलवर रुजवणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त राजुरा येथे एक स्तुत्य उपक्रम पार पडला. सामाजिक बांधिलकीची जाणीव बाळगून सलग सात वर्षांपासून रक्तदानाच्या माध्यमातून समाजसेवा करणाऱ्या अमोल राऊत व त्यांच्या नागवंश युथ फोर्स बहुउद्देशीय संस्था, राजुरा यांच्या वतीने यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात ३५ रक्तदात्यांनी स्वखुशीने रक्तदान करून महामानवांना खरी मानवंदना अर्पण केली.
“जात ही अपघाताने मिळते, पण माणुसकी मात्र आपल्या कर्मातून दिसते,” हा विचार प्रत्यक्ष कृतीतून जगवणारे हे रक्तदाते समाजासाठी आशेचे दीप ठरले आहेत.
रक्तदान शिबिराचे आयोजन गट साधन केंद्र, पंचायत समितीसमोर, राजुरा येथे करण्यात आले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्याचा हा एक नवा व सकारात्मक मार्ग समाजापुढे ठेवण्यात नागवंश युथ फोर्स संस्थेचा मोलाचा वाटा आहे.
या उपक्रमात अमोल राऊत यांच्यासह धनराज उमरे, रवी झाडे, जय खोब्रागडे, नूतन ब्राम्हणे, प्रमोद देठे, आकाश नळे, उत्कर्ष गायकवाड, राहुल अंबादे, रविकिरण बावणे, के.पी. झाडे, गणेश देवगडे, नितीन नगराळे, सुरेंद्र फूसाटे, राहुल माणूसमारे, शकिलदास जगताप आदींनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या शिबिरात महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा रक्तपेढी, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथून आलेले डॉ. वैष्णवी गुजर, ईश्वरी जुमडे, गायत्री पाटील, यतीन रोडे, आशिष कांबळे, अमर धोटे व वाहन चालक निश्चय जवादे यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
ही केवळ एक जयंती नव्हे, तर महामानवांच्या विचारांना कृतीत उतरवण्याचा एक प्रेरणादायी प्रयत्न होता.