बिबी येथील तरुणांनी कब्रस्तानात फुलवली हरित बाग

0
5

बिबी येथील तरुणांनी कब्रस्तानात फुलवली हरित बाग

‘माझी वसुंधरा अभियान’अंतर्गत लोकसहभागातून वृक्षारोपण

 

कोरपना : ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अंतर्गत बिबी येथील कब्रस्तानात मुस्लिम तरुणांच्या पुढाकाराने हरित बाग फुलविण्यात आली आहे. लोकसहभागातून हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे संरक्षण, देखभाल आणि संवर्धन यासाठी हे युवक झटून काम करीत आहेत. विशेष म्हणजे ते स्वतःच झाडांना नियमित पाणी देणे, निगा राखणे आणि श्रमदान करण्याचे सतत कार्य करीत आहेत.
गेल्या तीन वर्षापासून सतत वृक्षारोपण करण्यात येत असून यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. उपक्रमात शंभर टक्के वृक्ष संवर्धन करून जगवले आहेत. या प्रयत्नामुळे संपूर्ण कब्रस्तान परिसर हरित बगिच्यात परिवर्तित झाला आहे.

 

हरित क्रांतीचे अनोखे उदाहरण

या उपक्रमाअंतर्गत फळझाडे, औषधी वनस्पती आणि सावली देणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. या वृक्षांमुळे पर्यावरणपूरक वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील नागरिकांनाही सकारात्मक ऊर्जा मिळत आहे. विशेष म्हणजे, या तरुणांनी वृक्षसंवर्धनासाठी कोणत्याही सरकारी मदतीची वाट न पाहता आपल्या मेहनतीच्या जोरावर ही अनोखी बाग फुलवली आहे.

 

लोकसहभाग आणि श्रमदानाचा आदर्श उपक्रम

या मोहिमेमुळे बिबी ग्रामपंचायतीने पर्यावरण संवर्धनासाठी घेतलेला पुढाकार अधोरेखित होतो. ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत बिबीमध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले असले, तरी कब्रस्तानातील या हरित बगिच्याचे काम विशेष कौतुकास्पद आहे.

 

माझी वसुंधरा अभियान’ला नवा आयाम

ग्रामपंचायत बिबीच्या स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक विकासाचा हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा असून, या उपक्रमामुळे ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ अधिक प्रभावीपणे राबवले जात आहे. ग्रामीण भागात पर्यावरण संरक्षणासाठी लोकसहभागाचे हे उत्तम उदाहरण ठरले असून बिबी येथील मुस्लिम युवकांचे कार्य कौतुकास्पद आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here