नागपूर महामार्गावर भीषण अपघात : गडचांदूरच्या युवकाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
कोरपना / प्रतिनिधी
नागपूर महामार्गावर आज सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास नंदोरी-जाम दरम्यान भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरला धडकून विरुद्ध बाजूला जाऊन उलटली. या अपघातात गडचांदूर येथील मयूर मनोहर बुराण (वय ३०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी रितिका मयूर बुराण (२८) गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मयूर बुराण हे नागपूर येथे अभियंता म्हणून कार्यरत होते. नुकताच नोव्हेंबरमध्ये त्याचा विवाह पार पडला होता. होळी सणानिमित्त ते पत्नीसमवेत स्वगावी गडचांदूरला आले होते. होळी सणानंतर दोघेही नागपूरला परत जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला. अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व मयूर यांच्या पार्थिवाला समुद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.
मयूर यांच्या आकस्मिक निधनाने गडचांदूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज दि. २० ला गडचांदूर येथील मोक्षधाममध्ये त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.