परिवहन विभागातील प्रताप… सरनाईक यांनी थांबवावा – आ. किशोर जोरगेवार

0
4

परिवहन विभागातील प्रताप… सरनाईक यांनी थांबवावा – आ. किशोर जोरगेवार

परिवहन विभागातील भ्रष्ट कारभारावर आ. जोरगेवार यांनी व्यक्त केला संताप

अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी परिवहन विभागातील भ्रष्ट काराभाराडे सभागृहाचे लक्ष वेधत या विभागातील प्रताप, सरनाईकांनी थांबवावा असे म्हणत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी केली. यावर उत्तर देतांना ना. प्रताप सरनाईक यांनीही कार्यवाही करणार असल्याचे सकारात्मक उत्तर सभागृहात दिले आहे.
आरटीओ विभागाच्या वतीने कोणतीही तपासणी न करता वाहनांना परवाने दिले जात आहेत. यातील अनेक वाहने प्रदूषणास तसेच अपघातास कारणीभूत ठरत आहेत. चार वर्षांपासून एकाच अधिकाऱ्याकडे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती करून आरटीओ विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात केली.
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभारावर चांगलेच संतापले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रश्न विचारताना त्यांनी चंद्रपूर येथील प्रभारी आरटीओ बदलणार आहात का, असा थेट प्रश्न उपस्थित करत आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
यावेळी आ. जोरगेवार म्हणाले की, “आरटीओ विभागात रॅकेट सक्रिय रित्या कार्यरत आहे. मोठ्या ट्रान्सपोर्ट वाहने कार्यालयात जाऊन कोणत्याही प्रकारची तपासणी न करता त्यांना परवाने दिले जात आहेत,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
चंद्रपूर येथे आरटीओची जागा रिक्त असतानाही प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या भरवशावर आरटीओ कार्यालय चालवले जात आहे. परराज्यातील वाहनचालक येथे येताना त्यांची कुठल्याही प्रकारची चौकशी केली जात नाही. मागील काही घटनांमधून आरटीओ विभागातील भ्रष्ट कारभार उघड झाला असतानाही अधिकाऱ्यांची उचलबांगडी होत नाही, मृतक व्यक्तीच्या नावाने परवाना देण्याचा प्रताप या विभागाने केला. ही गंभीर बाब आहे. त्यामुळे येथे तात्काळ नियमित आरटीओ अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली. यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी “लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील राख वाहतुकी संदर्भात त्वरित उपाययोजना करा

चंद्रपूर जिल्ह्यातील पावर प्लांटमधून मोठ्या प्रमाणात राख निर्माण होते. ही राख सिमेंट उद्योग आणि रस्ते बांधकामासाठी वापरली जाते. मात्र, राख वाहतुकीवर कोणतेही नियमन नसल्यामुळे प्रदूषण आणि अपघातांची शक्यता वाढली आहे. नुकताच चंद्रपूर-नागपूर महामार्गावर खुल्या ट्रकने राख वाहून नेताना एसटी बसला धडक बसून गंभीर अपघात झाला. यामध्ये बसचालकाचा मृत्यू झाला आणि अनेक प्रवासी जखमी झाले. अशा दुर्घटना टाळण्यासाठी राख वाहतुकीसाठी निश्चित वेळेचे बंधन आणि वाहने सुरक्षित असावीत, याची तपासणी आवश्यक आहे. परिवहन विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा धोका वाढत असल्याचा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here