राजुरा विधानसभा क्षेत्राला प्रदूषणाचा विळखा!
सिमेंट कंपनी, कोल वॉशरी, वेकोलिच्या खाणींमुळे प्रदूषणात वाढ
आमदार देवराव भोंगळे यांची विधानसभेत अर्धातास चर्चा ; पर्यावरण मंत्र्याचे उपाययोजना करण्याचे आश्वासन!
राजुरा विधानसभेत वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. परिसरातील गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आमदार देवराव भोंगळे यांनी यासंदर्भातील वास्तव परिस्थिती विधानसभेत मांडली. त्यानंतर पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी पंधरा दिवसांत चंद्रपूर जिल्ह्यात येऊन तोडगा काढणार असल्याचा शब्द दिला. तसेच यासंदर्भात तातडीने एक तज्ज्ञ समिती गठीत केली जाईल. यात लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येईल व निर्णय घेण्यात येईल अशीही घोषणा केली.
राजुरा कोरपना तालुक्यातील वेकोलीच्या कोळसा खाणी, सिमेंट कंपन्या व कोल वॉशरी यामुळे या भागातील हवा, पाणी, ध्वनी व मृदा प्रदूषणात भर पडत आहे. याबाबत मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची व उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली. वेकोलीमध्ये बंकर उडवताना ध्वनी प्रदूषण होत आहे. मर्यादेपेक्षा अधिक डेसिमल आवाजामुळे ध्वनी प्रदूषण वाढले आहे. ब्लास्टींगच्या हादऱ्यांनी या भागातील घरांना तडे गेले आहे. हवेत मोठ्याप्रमाणात धुळीचे कन उडत असल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये आरोग्याची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. वेकोलीच्या परिघात येत असलेल्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागले आहेत, वेकोलीमुळे पाण्याची पातळी खालावली असून या परिसरात मोठ्या प्रमाणात क्लोराईडयुक्त पाणी असल्याने येथील नागरिकांना विविध आजारांना समोर जावे लागत आहे. धुळीमुळे या परिसरातील जमिनीची पत घसरली असून पिकांवर मोठ्याप्रमाणात धुळीचे थर साचत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. राजुरा तालुक्यात मुख्य मार्गावर सुरू असलेल्या कोल वॉशरीजमधून मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
राजुरा – कोरपना तालुक्याची जीवनदायनी म्हणून ओळख असलेल्या बारमाही वाहणाऱ्या वर्धा नदीला मिळणाऱ्या नाल्यांमध्ये वेकोलीचे प्रदूषणयुक्त पाणी सोडल्या जात असल्याने नदीचे पाणी सुद्धा दूषित होत आहे. गडचांदूर परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांमुळे व राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या कोळसा खाणी, कोल वॉशरीजमुळे या परीसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मात्र कंपन्या शेतकऱ्यांना शेत पिकांची नुकसान भरपाई देत नसल्याने प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी आमदार देवराव भोंगळे यांनी केली आहे.
कोरपना तालुक्यात असलेल्या गडचांदूर शहरातील माणिकगढ सिमेंट कंपनीमधून निघणारा धूळ शहरातील घरांवर पडत असून येथील नागरिकांचे जीवनमान खालावले आहे. पालगाव येथील अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून पालगाव सह परिसरातील गावांत मूलभूत सुविधा दिली नाही. अंबुजा सिमेंट कंपनी मध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. नागरिकांचे आरोग्य सुदृढ राखण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून मोठी आरोग्य शिबिरे व्हावीत, रुग्णांच्या शस्त्रक्रिया, उपचार यासाठी भरीव मदत मिळाली पाहिजे. त्यासाठी एक समिती प्रदूषणाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी गठीत करावी. यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी डिस्पले लावावेत. प्रदूषणाच्या कायद्यात, नियमात बदल करावेत अशी अपेक्षाही आमदार देवराव भोंगळे यांनी व्यक्त केली.