खाजगी व शेतकरी मुलगा नको गं बाई…!
मुला-मुलींचे वय वाढत चालले तरीही ही समस्या सुटेना…
सध्या सगळीकडे लग्नसराई सुरु आहे.अनेक कलाकार लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत. एकीकडे ही लग्नसराई सुरु असताना दुसरीकडे खाजगी कंपनीत व शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळेना झाल्या आहेत. ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. मुलींना सरकारी, व्यावसायिक, चांगल्या नोकरीला असणारा, चांगला कमावता असणारा मुलगा पाहिजे. पण, खाजगी व शेतकरी मुलगा नको. याला कारण म्हणजे मुलींच्या आणि त्यांच्या आई-वडिलांच्या वाढत्या अपेक्षा…!
एकीकडे मुलींची संख्या कमी झाली आहे, तर दुसरीकडे मुलांचे वय वाढत आहेत. त्यांना लग्नासाठी कोणी मुली देईनात… आताच्या काळात सगळेच ऍडव्हान्स झाले आहेत. मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांची अपेक्षादेखील मोठी असते. आपल्या मुलीचे पुढे चांगले व्हावे, म्हणून प्रत्येक आई-वडील तिच्यासाठी चांगले स्थळ शोधून तिचे लग्न लावून देतात.
पण गावाकडे शिकणाऱ्या मुलांची थोडी बिकट परिस्थिती आहे. काही मुलांना घरच्या गरिबीमुळे त्यांना चांगले शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे छोटे,मोठे कामे,कुण्यातरी खाजगी कंपनीत किंवा आपली घरची शेती करून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात.
मात्र, आजकालच्या मुलींना शहर म्हटले की,चांगले जीवन आणि गाव म्हटले कि कमीपणाचे वाटते. एवढेच नाहीतर गावाकडच्या मुलीदेखील शहरातील एक चांगले स्थळ बघतात आणि लग्न करतात. पण, त्यादेखील शेतकरी मुलाशी लग्न करीत नाही.
बस्ता’ या चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, ‘नोकरदाराशी लग्न करून नोकर म्हणून जगण्यापेक्षा मी एका शेतकऱ्याशी लग्न करून मालकीण म्हणून जगेल’.असा विचार जर आताच्या मुलींनी केला तर हा प्रश्न सुटायला जास्त वेळ नाही लागणार आणि समतोल राखला जाईल.
या सर्व झटापटीत अनेक मुला-मुलींचे वय वाढत चालले आहे. अनेक मुला-मुलीचे रूपांतर प्रौढात झाले असून त्यांचे विवाहाचे वय आणि शारीरिक अवस्था देखील निघून जात आहे. अनेकांनी या जन्मात आपला विवाह होईल, ही आशा देखील सोडून दिलेली आहे.
समाजातील या गंभीर समस्येस नेमकं जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे. अनेक विवाह संस्था, वधू-वर सूचक केंद्र, विवाह जमवणारे रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. मात्र, तरीही ही समस्या सुटताना दिसत नाही.
बरं शेतजमीन म्हणावी तर शेतकर्यांनापण कोणी मुली देत नाही. मग नेमकं हवंय तरी काय मुलींना आणि त्यांच्या घरच्यांना. सगळं कसं एकदम तयार हवं, जिथल्या तिथे काय तर म्हणे मुलीला त्रास नको, अरे मुळात कष्टातला आनंदच विसारलीयेत ही माणसं. अलीकडे लोक एकत्र कुटुंबात मुलगी द्यायला तयार नाही होत. जास्ती नाती नको म्हणतात. आताशा मुलाचं लग्न होत नाही म्हणून झुरणारे आईबाप पाहिले की जीव व्याकूळ होतो पण दोष कोणाला द्यावा?तथाकथित वंशांच्या दिव्यांसाठी लाखो निष्पाप कळ्या खुडणार्यांना!हे अशाच लोकांचे हे पाप आता हा समाज भोगतोय. मुलांनी तर लग्न होत नाही म्हणून बोभाटा का करावा!कोणता बाप आजमितीला छातीठोकून सांगू शकतो की, माझा मुलगा निव्र्यसनी निष्कलंक आहे.ठेवलाय का तो अभिमान आपण आपल्या बापासाठी शिल्लक!नाही ना!
– पंकज रामटेके