गुरूदेव सेवा मंडळाच्या महिलांनी बंद पाडली वरूर रोड येथील अवैध दारू विक्री…

0
31

गुरूदेव सेवा मंडळाच्या महिलांनी बंद पाडली वरूर रोड येथील अवैध दारू विक्री…

राजुरा (ता.प्र.) २७ फेब्रु. :– राजुरा मुख्यालयापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या वरुर रोड येथे मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्यांनी चांगलेच बस्तान मांडले आहे. त्यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून शाळकरी विद्यार्थ्यांवर अनेक दुष्परिणाम दिसून येत आहेत, महिलांना सुद्धा याचा फार त्रास होतोय. कुटुंबीयांचे मोठे नुकसान होत होते. या गंभीर बाबी लक्षात घेऊन वरुड रोड येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांनी आक्रमक पवित्रा घेऊन येथील अवैध दारू विक्री बंद पाडली. दरम्यान महिला शक्तींनी काल २६ तारखेला महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर रूद्रावतार धारण करून गावात रात्री उशिरापर्यंत धडक कारवाई करून अवैध विकी बंद पाडली.

श्री गुरुदेव सेवा मंडळ वरुर रोड कडून दारू जप्त – महिलांची हिम्मत आणि संघर्ष
श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या महिला शाखेने गावात दारूबंदी करण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. मंडळाच्या अध्यक्ष सौ. बेबीबाई धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी एकत्र येत, खुलेआम दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली.

महिलांनी स्पष्टपणे सांगितले की गावात सर्रास दारू विक्री होत असल्याने समाजावर वाईट परिणाम होत आहे. त्यामुळे “दारू हटाओ, गाव बचाओ” या घोषणेने त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत संघर्ष केला.

सदर मोहीमेअंतर्गत खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली.
गेल्या 24 तासांत गावातील चार ठिकाणी दारू जप्त करण्यात आली.
• सकाळी 11:00 वाजता : चित्रा लक्ष्मण पीदुरकर
• 12:30 वाजता : शंकर पोचू इंदलवार
• रात्री 8:00 वाजता : श्यामा सुभाष रणदिवे
• रात्री 11:30 वाजता : गंगाराम गुमलवार

या मोहिमेमुळे गावात एक नवा आदर्श निर्माण झाला असून, महिलांची ही हिम्मत आणि एकजुटीचे कौतुक होत आहे.

हफ्ताखोरीमुळे पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग निद्राधीन
जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री तसेच अवैध धंदे फोफावत असताना दिसून येत आहे. यावत होणारी नाममात्र कारवाई हि सबंधित विभाग हफ्ताखोरीमुळे सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा एरवी संपूर्ण तालुक्यातील सुजाण नागरिकांत दिसून येते. सबंधित विभागाने तोकड्या आर्थिक लालसेपोटी घेतलेले झोपेचे सोंग नक्कीच भविष्यात प्रशासनाच्या अंगलट येईल यामध्ये तिळमात्र शंका नाही.

यावेळी श्री. गुरुदेव सेवा मंडळ वरुर रोड च्या अध्यक्ष बेबीबाई धानोरकर यांच्या पुढाकाराने गुरूदेव सेवा मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांनी दिवसभर व रात्री उशिरापर्यंत पहारादेवून ही मोहीम राबवली. तर गावातील ही अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यासाठी पोलीस विभाग तसेच संबंधित विभागाने याविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here