वाळू माफियांची मुजोरी, महसूल प्रशासनाने मारलेले खड्डे बुजवून वाळू चोरी सुरूच…
राजुरा, २४ फेब्रु. :- कविटपेठ, चिंचोली (बू.) वर्धा नदी पात्रात वाळू माफियांनी चांगलाच हैदोस घालून जेसीबी व पोकल्यांड साहाय्याने वारेमाप वाळूचा उपसा करून लाखो रुपयांचा शासकीय महसूल पाण्यात बुडविला. १५ दिवसांअगोदर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानंतर सदर ठिकाणी कार्यवाही करून नदीपात्रात जाणाऱ्या मार्गावर जेसिबीने खड्डे करण्यात आले. मात्र अट्टल वाळू माफियांनी महसूल प्रशासनाने मारलेले खड्डे बुजवून महसूल प्रशासनाला ठेंगा दाखवत पुन्हा वाळू तस्करी सुरू केली असल्याची जोरदार चर्चा स्थानिक जनतेत आहे.
राज्य शासनाने वाळू संदर्भात अद्यापही कोणतेही धोरण जाहीर केले नसल्याने अवैध वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे.
या ठिकाणाहून वाळूची वारेमाप वाहतूक करून कमी कालावधीत लक्षाधीश झालेल्या वाळू माफियांची मुजोरी वाढत चालली असून प्रशासनालाच डोइजड ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या ठिकाणी दोन ते तीन वाळू माफियांच्या टोळ्या सक्रिय असल्याचे स्थानिक जनतेत बोलल्या जात आहे. प्रशासनाच्या कार्यवाहीला धाब्यावर बसवून हे तस्कर चारचाकी वाहन घेऊन येऊन रात्रभर पहारा देत जेसीबी नदीपात्रात उतरवून हायवाच्या साहाय्याने वाळूचा सर्रासपणे उपसा करत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
सदर ठिकाणी रात्रपाळीत थैमान घालणाऱ्या टोळीजंग वाळू माफियांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई करून यांच्या मुसक्या आवळण्यात याव्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.