मिरचिने आणले शेतकऱ्याचा डोळ्यात पाणी
भाव कमी असल्याने शेतकरी हवालदिल…
आवाळपूर / सतीश जमदाडे
कापूस उत्पादक तालुका म्हणून ओळखल्या जात असला तरी आता शेतकरी विविध पिके घेऊन उत्पादन घेत आहे. यात मिरचीची सुद्धा लागवड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केल्या जाते. दरवर्षी टक्का वाढतच चालला आहे. रोख स्वरूपात मिळणारे उत्पादन असल्याने खर्चाची बाब असली तरी देखील शेतकरी मिरचीची लागवड करीत आहे. परंतू मागचा दोन वर्षीचा तुलनेत यंदा भाव कमी असल्याने शेतकरी चिंतेच पडला आहे. भाव नसल्याने झालेल्या खर्चाची भरपाई तरी होणार की नाही यामुळे शेतकरी चिंता ग्रस्त असून यावर्षी कापूस भाव वाढ न झाल्याने व आता मिरचीला ही भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे दिसून येते आहे.
तालुक्यात या वर्षी ८२० हे. क्षेत्रात मिरची लागवड केली आहे. मागील काही वर्षा क्षेत्रात मिरची लागवडीत वाढ झाली आहे. परंतू यंदा मिरचीला भाव नसल्याने शेतकरी चिंतातुर झाला असून भाव वाढणार की काय या प्रतिक्षेत आहे तर काही शेतकऱ्यांनी विक्री सुद्धा सुरू केली आहे.
मागचा वर्षी १५ ते १७ हजार रूपये भाव होता. त्याचा आधल्या वर्षी २३ ते २५ हजार रुपये भाव होता. या वर्षी मात्र ७ ते १० हजार रुपये मिरचीला भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात मिरची विक्री करीता अधिक भर दिसून येत आहे.
मिरची उत्पादन घ्यायला खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो. कमीत कमी ३ फवारणी व दोन वेळा खत द्यावे लागते. त्यासोबत रोपटे छोटे असताना महिला लावून निंदन करावे लागते. तसेच तोडणी करीता महिलाना २०० ते ३०० रोजी द्यावी लागते. असा एकदरीत एका एकराला ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. त्या तुलनेत पिक मात्र १० ते १५ क्विन्टल येते. त्यातही रोग (व्हायरस) आला तर मग ८ ते १० क्विंटल पिकविणे कठीण जाते. ना नफा ना तोटा या तत्वावर शेतकऱ्यांनी पीक घ्यावे लागते. यावर्षी भावच कमी असल्याने तोट्यात जाण्याची शक्यता शेतकऱ्याकडून वर्तविली जात आहे.
मिरचीला खर्च अधिक लागतो त्यामुळे छोटे शेतकरी याकडे वळत नाही या वर्षी भाव ही कमी असल्याने आता आहे त्या शेतकऱ्यांनी मिरची पीक घ्यायचे कसे असा प्रश्न पडला आहे त्यामुळे शासनाने कमीत कमी १७ हजार रुपये तरी भाव द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. – बापुराव सदारेड्डी शेतकरी लालगुडा
दहा एकर मध्ये मिरची लागवड केली असून भाव कमी असल्याने मिरचीची शेती करणे परवडण्या जोगे राहिले नाही. निघलेली एवढी मोठी मिरची करायची काय त्यामुळे शासनाने तात्काळ भाव वाढ करावी. – घागरू कोटनाके, राजूरगुडा