कविटपेठ येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुलाचे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम साजरा…
impact24news Network
विरूर स्टे. (राजुरा), 22 फेब्रु. :- राजुरा तालुक्यातील कविटपेठ ग्रामपंचायत तर्फे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे 4 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत घरकुलाचे मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.
देशाचे गृहमंत्री ना. अमित शाह यांच्या शुभहस्ते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा – 2” मधील राज्यातील 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व किमान 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण कार्यक्रम आज दुपारी 4:45 वाजता मुख्य बॅडमिंटन हॉल, श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे या ठिकाणी पार पडला. यावेळी राज्यस्तरीय कार्यक्रमा बरोबरच राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावर देखील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने कविटपेठ येथे ग्रामपंचायत सरपंचा यांच्या अध्यक्षतेखाली घरकुल लाभार्थ्यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्र वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्याचे प्रयोजन करण्यात आले. गावातील प्रधानमंत्री आवास योजनेतील 44 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले.
यावेळी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंचा विजया राठोड, प्रमुख उपस्थिती म्हणून बांधकाम विभाग राजुरा चे शाखा अभियंता सचिन चव्हाण, शाखा अभियंता विनोद सहारे, श्री. हंपिजी कनिष्ठ सहायक तसेच ग्रामविकास अधिकारी मनिष आस्वले, ग्रामपंचायत सदस्य आनंदराव देठे, सदस्य विश्वेश्वरराव जिवतोडे, संगणक परिचालक जयराज दोरखंडे, शिपाई आनंदराव पाकुलवार यासह लाभार्थी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.