लक्कडकोट चेक पोस्ट येथील सहायक मोटर वाहन निरीक्षक अडकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…
राजुरा, २२ फेब्रु. :- असिफाबाद ते चंद्रपूर रोडवरील लक्कडकोट गावाजवळ असलेल्या आरटीओ चेक पोस्ट वर कार्यरत असलेले सहायक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते व यांच्या हाताखाली कामाला असलेला खाजगी इसम जगदीश डफडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावतीच्या संचाने ट्रकचालक यांच्याकडून ५०० रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करून ताब्यात घेतले आहे. सदरचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया राजुरा पोलीस ठाणे येथे सुरू आहे.
राजुरा तालुक्यात येत असलेले महाराष्ट्र व तेलंगणा सीमेवरील लक्कडकोट गावाजवळ आरटीओ चेक पोस्ट आहे. मात्र सदर चेक पोस्ट हा नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याची चर्चा स्थानिक जनतेत व वाहन चालकांत सुरू असते. या चेक पोस्ट वर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकांना नाहक त्रास देऊन पैसा उकळण्याचा गोरखधंदा वारंवार चर्चेत असतो. मात्र यावर सबंधित विभागाकडून कोणतेही ठोस पाऊले उचलली गेली नसल्याचे दिसून येते.
तेलंगणा वरून छत्तीसगढ, महाराष्ट्र, मध्यप्रदेश मार्गे चालणाऱ्या ट्रक मालकाने सदरची तक्रार केली असता अमरावती लाचलुचपत विभागाने काल सापळा रचून कार्यवाही केली. या कार्यवाहीत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडून ५६१०० रुपयाची रोख रक्कमही मिळाली आहे. आरटीओ कर्मचारी व त्यांचेकडून ठेवण्यात आलेल्या खाजगी एजेंट कडून ट्रक चालकांना या चेकपोस्ट वर नाहक त्रास दिल्याची तक्रारी ट्रक चालकांकडून करण्यात येत असतात. मात्र यावर डोळेझाक होत असताना मिळालेल्या तक्रारीच्या आधारे अमरावती विभागाने केलेल्या कार्यवाहीने चांगलीच धडकी भरली आहे.
सदरची कार्यवाही अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ला. प्र. वि. अमरावती चे पोलीस उपअधीक्षक मंगेश मोहोड, केतन मांजरे, योगेशकुमार दंदे, युवराज राठोड, राजेश मेटकर, वैभव जायले, आशिष जांभाळे यांनी पार पाडली.
नागरिकांनी भ्रष्टाचारा संबंधी तक्रार देण्यासाठी समोर येऊन फोन नंबर ०७२१-२५५२३५५, मोबाईल क्रमांक ७०२०६९३४८१, टोल फ्री क्रमांक १०६४ या क्रमांकावर संपर्क करून भ्रष्टाचारास आळा घालावा, असे आवाहन अमरावती विभागातर्फे करण्यात आले आहे.