प्रमोद महाजन कला उद्यानाला अधिक सुंदर बनवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांची उद्यानाला प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर नागरिकांना ग्वाही
मुंबई / महेश कदम
दादर येथील प्रमोद महाजन कला उद्यानात आवश्यक असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण केली जातील. स्वच्छतागृह, वीज, पाणी आदी सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध करुन दिल्या जातील. या उद्यानाला अधिक सुंदर बनविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी या उद्यानातील ’ज्येष्ठ नागरिक समूहाच्या सदस्यांना दिली.
दादर (पश्चिम) येथील प्रमोद महाजन कला उद्यानाला प्रत्यक्ष भेट देऊन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी आज (दिनांक १९ फेब्रुवारी २०२५) पाहणी केली. उप आयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त श्री. अजितकुमार आंबी, उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी म्हणाले की, प्रमोद महाजन कला उद्यान हे परिसरातील नागरिकांसाठी विरंगुळ्याचे उत्तम ठिकाण आहे. पावसाळ्यात जास्त पाऊस झाल्यास ते साठविण्यासाठी उद्यानामध्ये भूमिगत टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या टाकीवर सुरक्षेचे सर्व नियम आणि उपाययोजनांचा विचार करुन हिरवळ (लॉन) लागवडीसंदर्भात अभ्यास करावा. उद्यानात पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी ठिकठिकाणी वीजेच्या दिव्यांची उभारणी करावी. उद्यानात येणाऱ्या नागरिकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध करुन द्यावे, अशा सूचना श्री. गगराणी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी ज्येष्ठ नागरिक समूहाचे सदस्य उद्यानात उपस्थित होते. त्यांच्याशीही आयुक्त श्री. गगराणी यांनी संवाद साधला. नागरिकांनी उपस्थित केलेल्या विविध विषयांसंदर्भात यथोचित तोडगा काढण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्त महोदयांनी दिली.