रय्यतवारी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी : स्वराज्य रक्षक मंडळ रय्यतवारीचा उपक्रम
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श भावी पिढीस मार्गदर्शक – नितीन गोहने
वर्धा / अर्पित वाहाणे
सावली :- तालुक्यातील रय्यतवारी येथे स्वराज्य रक्षक मंडळ रय्यतवारी यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शिवजयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे उदघाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व जेष्ठ काँग्रेस नेते प्रशांत पाटील चिटणुरवार यांचा हस्ते करण्यात आले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्याचे संस्थापक, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचा प्रतिमेला हार व पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने, माजी सरपंच व्याहाड खुर्द तथा ग्रामपंचायत सदस्य केशव भरडकर, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याधापक कांबळे सर, रय्यतवारी येथील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी बबन सोनटक्के आदी उपस्थित होते.
शिव जयंती निमित्य कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना नितीन गोहने यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवून मराठी राज्य सुजलाम सुफलाम केले. त्यांचे विचार हे भावी पिढीसाठी मार्गदर्शनाचे काम करेल असे प्रतिपादन केले.