जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाच्या नविन पदनिर्मीतीस शासनाकडून मान्यता
आमदार देवराव भोंगळे यांच्या मागणीची शासनाकडून दखल
चंद्रपुर, दि. १४ फेब्रुवारी
जिल्हा मुख्यालयापासून १०० कीमी अंतरावर असलेल्या आदिवासी बहूल जिवती तालुक्यात नव्याने स्थापन केलेल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पद निर्मीतीचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. दि. १३ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील अनेक श्रेणीवर्धीत रूग्णालयांच्या पदनिर्मीतीस मान्यता देण्याचा निर्णय घेतला असून त्यात जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाचाही समावेश असल्याने नवनिर्वाचित आमदार श्री. देवराव भोंगळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
जिवती येथील आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून १७ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्यात आले. परंतू याठिकाणी पदनिर्मीती केली नसल्याने आरोग्य सेवा पुरवण्यात अनेक अडचणी येत होत्या. सदर बाब लक्षात येताच राजुरा विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार श्री. देवराव भोंगळे यांनी मागील हिवाळी अधिवेशनात दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करीत असतांना जिवती येथील ग्रामीण रुग्णालयाकरीता लवकरात लवकर नविन पदनिर्मीतीस शासनाने मान्यता द्यावी अशी मागणी केली होती. सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत सार्वजनिक आरोग्य विभागाकडून दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी निघालेल्या शासन निर्णयात सदर ग्रामीण रुग्णालयाकरीता १० नियमित व १६ मनुष्यबळ संख्येच्या प्रमाणात बाह्ययंत्रणेद्वारे भरावयाच्या पदांच्या निर्मीतीकरता मान्यता प्रदान केली आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे जिवती तालुक्यातील नागरीकांनी आनंद व्यक्त केला असून या बहुप्रलंबीत प्रश्नाला तातडीने मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल आमदार श्री. देवराव भोंगळे यांचे जिवती वासीयांनी आभार मानले आहे.