शालेय सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी – आ. किशोर जोरगेवार
विद्या विहार स्कुल येथे स्नेहमील आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन
शिक्षण ही केवळ पुस्तकांपुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया आहे. अशा विविध उपक्रमांमधून विद्यार्थी जीवन कौशल्ये शिकतात, संस्कार आत्मसात करतात आणि समाजातील जबाबदार नागरिक म्हणून घडतात. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो, संघभावना निर्माण होते आणि त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
विद्या विहार स्कूल येथे स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, शिक्षक विभागाचे आमदार सुधाकर अडबाले, सरदार पटेल मेमोरीअर ट्रस्ट चे अध्यक्ष विनोद तत्तात्रे, विद्या विहार स्कूल चे संचालक चंद्रा रेड्डी, शोभा रेड्डी, क्रिष्णा रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “आजच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांची प्रतिभा आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसून येतो. शाळेतील अशा उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहरते. त्यांच्या नृत्य, गाणे, अभिनय आणि विविध सादरीकरणांतून त्यांनी आपली कला आणि मेहनतीचे दर्शन घडवले आहे.
शिक्षक आणि पालक या दोघांची भूमिका विद्यार्थी घडवण्यात अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षक ज्ञानाचा प्रकाश देतात आणि पालक तो संस्कारात रूपांतरित करतात. विद्यार्थ्यांनीही आपले ध्येय निश्चित करून परिश्रमाने पुढे जायला हवे. शिक्षणासोबतच क्रीडा, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतल्यास त्यांचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षण हा जीवनाचा मूलभूत आधारस्तंभ आहे आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा आणि सामाजिक जाणीव यामध्येही उत्तम कामगिरी करणे गरजेचे आहे, असे ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.