देशभक्ती कृतीतून व्यक्त करा – आ. किशोर जोरगेवार
तुकूम येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन
सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, आणि सामाजिक समरसता ही आपल्या जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्वजण एकजुटीने आपल्या देशाच्या प्रगतीसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा घेऊन संविधानाने दिलेले अधिकार जसे महत्त्वाचे आहेत, तसेच दिलेली कर्तव्ये पार पाडणे हेही आपले कर्तव्य मानले पाहिजे. देशभक्ती ही केवळ शब्दांमध्ये मर्यादित नसून ती आपल्या कृतीतून व्यक्त झाली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शहीद भगतसिंग चौक समितीच्या वतीने तुकूम येथील एस.टी. वर्क शॉप चौक येथे ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील काळे, अशोक संगीडवार, वासुदेव सागमवार, पुरुषोत्तम राऊत, हरीश गाडे, वसंतराव धांडे, राजू वाहाडे, नरेश वानखेडे, रमेश कासुलकर, सुमित कासुलकर, आशीष बोंडे, कैलास सुरसावद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी तिरंगा झेंड्याला सलामी दिली. पुढे बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आजच्या दिवशी आपले संविधान लागू झाले, ज्यामुळे आपल्या भारत देशाला एक सार्वभौम, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी प्रजासत्ताक म्हणून ओळख मिळाली. आपल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय, आणि बंधुतेचा आधार दिला, ज्यामुळे आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दृष्टिकोनाने प्रगती करू शकलो. विविधता ही आपल्या एकतेचे प्रतीक आहे. या देशाच्या प्रगतीत प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. आपला प्रत्येक कृतीशील निर्णय भारताच्या भवितव्याला दिशा देणारा ठरतो. म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवून आपण आपल्या कर्तव्यांची जबाबदारी घेतली पाहिजे.
लोकप्रतिनिधी म्हणून आपण मतदारसंघाच्या विकासासाठी काही महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. शिक्षण, आरोग्य, आणि रोजगाराच्या संधी यासाठी विशेष योजना आखल्या जात आहेत. शहरातील प्रत्येक भागात मूलभूत सुविधा पोहोचाव्यात यासाठी मी कटिबद्ध आहे. आपली तरुण पिढी ही आपल्या देशाची खरी ताकद आहे. त्यांना गुणवत्ता आणि संधी मिळाल्यास, ते नक्कीच देशाला नवे शिखर गाठून देतील, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
येत्या काळात अनेक विकासकामे मतदारसंघात करायची आहेत. यातून येथील नागरिकांचे जीवनमान उंचावणार आहे. दीक्षाभूमी येथे जागतिक दर्जाचे काम होणार आहे. धानोरा बॅरेजचे काम पूर्ण करण्याचा आपला संकल्प आहे. यासह अनेक विकासकामे येत्या काळात होणार असल्याचेही आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
यावेळी माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी शांतीधामचे अध्यक्ष डॉ. अशोक वासलवार यांना शवपेटी उपलब्ध करून दिली. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.