भाजपाच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका : आप जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार
आम आदमी पक्षाचा आरक्षण बचाव कृती समितीच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा!
मध्यवर्ती बँकेच्या बोगस भरती प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या बेमुदत उपोषणाला आज आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन आपला ठाम पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात मनोज पोतराजे आणि रमेश काळबांधे हे मागील 11 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. बेरोजगार तरुणांच्या हक्कांसाठी ते झुंजत असून, बँकेच्या भरती प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचारामुळे हजारो बेरोजगार तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे.
भाजपाची आणि काँग्रेसची बँकेशी हातमिळवणी
या प्रकरणात विशेष म्हणजे मध्यवर्ती बँकेत काँग्रेसची सत्ता आहे. जर काँग्रेस चुकीचे काम करत असेल, तर भाजपाने बोगस भरती प्रक्रियेवर स्थगिती आणून बेरोजगार तरुणांना न्याय दिला असता. मात्र, भाजपाने काँग्रेससोबत हातमिळवणी करत आपल्या उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी बँकेतील व्यवस्थापनावर दबाव आणल्याचे उघड झाले आहे.
भाजपाच्या नेत्यांनी बँकेत लाच घेऊन अपात्र उमेदवारांना नियुक्ती मिळवून देत स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला आहे. काँग्रेसच्या सत्तेत भ्रष्टाचाराला चालना देण्यासाठी भाजपानेही परस्पर फायद्याचे धोरण स्वीकारल्याचा गंभीर आरोप आम आदमी पक्षाने केला आहे.
भाजपाच्या नेत्यांची दुटप्पी भूमिका
भाजपाच्या नेत्यांनी केवळ राजकीय स्वार्थासाठी आंदोलनाला भेट दिली आहे, मात्र कोणतीही ठोस कारवाई केली नाही.
4 जानेवारी 2025: आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनाला भेट दिली व समर्थन दर्शवले.
6 जानेवारी 2025: सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनस्थळी येऊन मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.
20 जानेवारी 2025: भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी आंदोलनाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला.
19 जानेवारी 2025: आमदार देवराव भोंगळे यांनी आंदोलनाला भेट देत आपली भूमिका मांडली.
22 जानेवारी 2025: भाजपाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष रवींद्र गीते आणि ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे यांनी आंदोलनाला भेट दिली आणि सहकार मंत्र्यांशी चर्चा करत मंत्रालयात बैठक लावली.
आम आदमी पक्षाच्या प्रमुख मागण्या
एसआयटीची स्थापना: बोगस भरती प्रकरणाची तातडीने एसआयटीमार्फत सखोल चौकशी करावी.
नियुक्ती थांबवावी: चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बोगस उमेदवारांना नियुक्ती देऊ नये.
कायदेशीर कारवाई: चौकशीत दोषी आढळलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
पात्र उमेदवारांना न्याय: चौकशीद्वारे पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच नियुक्तीपत्र दिले जावे.
आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या मागे ठामपणे उभा आम आदमी पक्ष
आम आदमी पक्षाने स्पष्ट केले आहे की, आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील. काँग्रेसच्या सत्तेत बँकेतील भ्रष्टाचार रोखण्यासाठी भाजपाचा निष्क्रियपणा आणि हातमिळवणी याचा तीव्र निषेध व्यक्त करत, आम आदमी पक्षाने आपल्या लढ्याला गती दिली आहे.
भाजपाच्या नेत्यांनी राजीनामा द्यावा
भाजपाच्या सत्ताकाळात झालेल्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी घेत, संबंधित नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे. “काँग्रेसच्या चुकीच्या कामांना पाठिंबा देऊन भाजपाने आपला खरा चेहरा दाखवला आहे,” असे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी म्हटले आहे.
बँकेच्या संचालकामार्फत उपोषण करत्यांना अमिष देण्याचा प्रकार सुरू आहे हे सुद्धा मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहे.
सदर आंदोलनाला आम आदमी पक्षाचा ठाम पाठिंबा:
आंदोलनाला भेट देताना आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, जिल्हा महासचिव संतोष दोरखंडे, शहराध्यक्ष योगेश गोखरे, महानगर संघटनमंत्री संतोष बोपचे, अशोक माहुरकर, शहर उपाध्यक्ष सिकंदर सागोरे, जिल्हा पदाधिकारी जितेंद्र कुमार भाटिया, शहर उपाध्यक्ष सुनील सदैभेया, सहकार आघाडी अध्यक्ष मधुकर साखरकर, पवन कुमार प्रसाद, महिला शहर अध्यक्ष अॅड. तबस्सुम शेख, शहर सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्नील घाघरगुंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आम आदमी पक्षाने भाजपाच्या दुटप्पी भूमिकेचा आणि काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा तीव्र निषेध करत, या प्रकरणात दोषींवर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी आम आदमी पक्ष शेवटपर्यंत लढा देईल,” असा ठाम विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे.