भेंडाळा येथील युवकाचा आकस्मिक मृत्यू
राजुरा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी हयगय केल्याचा गावकऱ्यांचा आरोप
राजुरा, ता. प्र. -राजुरा तालुक्यातील भेंडाळा या गावातील युवक समाधान दीनानाथ जीवतोडे, वय 20 हा युवक शेतात फवारणी करून घरी आला असता त्याची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला तातडीने राजुरा उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र येथील वैद्यकीय अधिका-यांनी त्याच्याकडे एक तास दुर्लक्ष केले आणि नंतर त्याची प्रकृती गंभीर होताच सलाईन लावून त्याला चंद्रपूर येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. मात्र त्याचवेळी या युवकाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यामुळे गावकरी व नातेवाईक गोळा झाले आणि त्यांनी वैद्यकीय अधिका-यांना जाब विचारला. यावेळी रूग्णालयात पोलिसांना पाचारण करण्यात आले. यानंतर गावकरी व नातेवाईकांनी राजुरा पोलिस ठाण्यात जाऊन याविषयी तक्रार दाखल केली. आज दिनांक 23 जानेवारी ही घटना घडली.
समाधान हा युवक गावातून मोटरसायकल वर बसून आणि चालत बोलत रूग्णालयात आला. मात्र त्याचेवर परिस्थिती पाहून तातडीने त्याचेवर योग्य औषधोपचार झाला असता तर त्याचा जीव वाचला असता, परंतु येथील उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हेळसांंड केल्यामुळेच आपल्या मुलाचा जीव गेला, असा आरोप समाधानचे वडील दीनानाथ जीवतोडे आणि गावकऱ्यांनी केला आहे. आपला मुलगा मरण पावल्यावर त्याला चंद्रपूर ला रेफर करण्याचे डाॅक्टरांनी सांगितल्याचे गावक-यांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे राजुरा उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येंने गावकरी जमा झाले आणि रूग्णालयातून प्रेत उचलण्यास विरोध केला. यानंतर राजुरा पोलिसांनी समजूत घालून नागरिकांना शांत केले. अखेर राजुरा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात वडील व नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. उशिरा या युवकाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर 7-30 वाजता प्रेत परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले.
समाधान हा गावातील अतिशय मनमिळाऊ आणि एकुलता एक मुलगा होता. त्याला वेकोलित भूमी अधिग्रहण झाल्याने लवकरच नोकरी मिळणार होती. या युवकाच्या अकस्मात मृत्यूने गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत. त्याच्यामागे आई – वडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत.
यासंदर्भात राजुरा उपजिल्हा रूग्णालयाचे अधिक्षक डाॅ. अशोक जाधव यांना विचारणा केली असता यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिका-यानी योग्य औषधोपचार केला. मात्र त्याला विषबाधा झाल्याने या युवकाला वाचवू शकलो नाही.