शालेय वर्षीय स्नेहमिलन उत्साह, प्रेरणा आणि संधींचा मंच – आ. किशोर जोरगेवार
प्रियदर्शनी कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन
शाळेचा वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रम म्हणजे एक अविस्मरणीय क्षण आहे, जिथे विद्यार्थी आपल्या कला, कौशल्य आणि क्रीडाप्रेमाचे दर्शन घडवतात. शाळा ही केवळ शिक्षणाचे मंदिर नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. आजच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील मेहनत आणि आत्मविश्वास दिसून आला असून शालेय वर्षीय स्नेहमिलन कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी उत्साह, प्रेरणा आणि संधींचा मंच असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
समता शिक्षण विकास महामंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित प्रियदर्शनी कन्या विद्यालयात वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समता शिक्षण विकास महामंडळाच्या अध्यक्षा तारा पोटदुखे, समाजसेवक नंदू अग्रवाल, प्रभाकर झुनघटे, मंगला धोपटे, रजनी अल्लुरवार, मेघा कामडी, अर्चना झुनघटे, ज्ञानेश्वर साटोने, मुख्याध्यापिका वैशाली भलमे, सलीम शेख, नकुल वासमवार आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आपली भूमिका राहिली आहे. परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, या दिशेने आपण काम करत आहोत. अनेक विद्यार्थ्यांना शाळेत यायचे साधन नसल्याचे लक्षात येताच आपण मुलींना दोन हजार सायकलींचे वितरण केले. तर माझ्या वाढदिवसानिमित्त 500 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 असे 9000 वह्यांचे वितरण करण्यात आले. पुढेही विद्यार्थ्यांसाठी असे शिक्षणोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचे ते यावेळी बोलत होते.
शाळेत मिळणारे शिक्षण, मूल्ये आणि संस्कार यामुळेच विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी तयार होतात. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि पालकांच्या पाठिंब्यामुळे येथील मुले शिक्षण, क्रीडा, कला आणि विज्ञान या सर्व क्षेत्रांत यशस्वी होत आहेत. विद्यार्थ्यांनी स्वप्ने मोठी ठेवत त्यांची पूर्तता करण्यासाठी सातत्याने मेहनत करावी. शिक्षण, शिस्त आणि प्रामाणिकपणा या तीन गोष्टी आयुष्यभर यशाकडे नेतील. लोकप्रतिनिधी म्हणून शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आवश्यक ते सहकार्य राहणार असल्याचे ते यावेळी बोलत होते. या कार्यक्रमाला शिक्षकवृंद, पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.