पुणे, १९ डिसेंबर २०२४
देशातील सर्वसामान्यांना,गोरगरिब, शोषित, पीडितांना हक्क बहाल करणारे संविधान निर्माते परमपूज्य, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान आंबेडकरी अनुयायी कदापि सहन करणार नाही.बाबासाहेबांमुळे सर्वसामान्यांनी, शोषित, वंचितांनी जिवंतपणीच स्वर्ग अनुभवला. बाबासाहेबांचे नाव घेणे हि कुठली फॅशन नाही, तर ती आंबेडकरी अनुयायांची ‘पॅशन’ आहे.बाबासाहेब म्हणजे समता, बंधुता, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा , उपासनेचे स्वातंत्र, दर्जाची व संधीची समानता, राष्ट्रीय एकता आणि एकात्मता. त्यामुळे घटनाकार डॉ.बाबासाहेबांचा अपमान करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशवासीयांची आणि आंबेडकरी अनुयायांची माफी मागावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी गुरुवारी (ता.१९) केली.
बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या मार्गावर चालण्याची शिकवण अनुयायांना दिली आहे. बाबासाहेबांचे विचारच आमच्यासाठी स्वर्ग आहेत. बाबासाहेबांच्या दूरदृष्टिमुळेच लाखो कुळांचा उद्धार झाला आहे. देशाचा उद्धारकर्त्या महामानवाचा देशाच्या सर्वोच्च सभागृहात अपमान होणे ,हि बाब समस्त देशवासीयांची मान शरमेने खाली घालणारी आहे, अशी खंत डॉ.चलवादी यांनी व्यक्त केली. बसपा सुप्रीमो उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावती जी यांनी देखील अमित शहा यांच्यासह राजकीय पक्षांकडून सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य केले आहे.
भाजप, काँग्रेस आणि इतर पक्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून राजकीय पोळी शेकून न घेता त्यांचा आदर-सन्मान केला पाहिजे. या पक्षांचे दैवत कुणीही असले तरी त्यावर बसपाला कुठलाही आक्षेप नाही. परंतु, दलित तसेच इतर मागासवर्गीयांसाठी बाबासाहेबच एकमेव दैवत आहे. बाबासाहेबांमुळेच या वर्गांना ज्या दिवसापासून देशात संविधान लागू झाले त्या दिवसापासून सात जन्माचे स्वर्ग मिळाले. काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्ष दलित तसेच इतर उपेक्षितांबद्दल दाखवत असलेले प्रेम हे दुट्टपी आहे. या पक्षांकडून या वर्गांचे हित जोपासना आणि कल्याण अशक्य आहे.