गोंडपिपरी एमआयडीसीमध्ये नवीन उद्योग उभारा!
आमदार देवराव भोंगळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी ; त्वरित कारवाई करण्याचे संबंधित विभागाला मुख्यमंत्र्याचे आदेश
राजुरा, दि. २०
गोंडपिपरी तालुक्यात मोठया प्रमाणात बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून येथील युवकांच्या हाताला काम मिळावे याकरिता राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राद्वारे गोंडपिपरी येथे एमआयडीसी करिता अधिग्रहीत केलेल्या शेत जमिनीवर उद्योगधंदे सुरू करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
गोंडपिपरी येथे लघु औद्योगिक क्षेत्राची स्थापना सन १९९० मध्ये करण्यात आलेली आहे. गोंडपिपरी औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याकरीता मौजा करंजी (ता. गोंडपिपरी) येथे महामंडळाने १४.०१ हे. जमीन संपादीत केलेली आहे. त्याकरिता प्रकरण ६ ची अधिसुचना दि. २७/०९/१९९० रोजी प्रसिध्द झालेली असून सदर जमिनीचा ताबा दि. ३०/०५/१९९७ रोजी महामंडळास प्राप्त झाला आहे. त्यामध्ये एकूण २५ भूखंडांचा आराखडा मंजूर झालेला असून २५ भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये भूखंड वाटपाचा दर रू. २३०/- प्रती चौ.मी. आहे. गोंडपिपरी औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्ते, विज, सोयीसुविधा उपलब्ध असून पाणीपुरवठा बोअरवेल मार्फत करण्याचे प्रस्तावित आहे.
सदरच्या औद्योगिक क्षेत्रात शंकर गोकुलदास अग्रवाल, मे. प्रपोज्ड प्रा.लि. यांना अलॉय स्टील चे उत्पादनाकरीता ७०३०० चौ.मी. जागेचे प्राधान्य सदराखाली भूखंड वाटप समितीने भूखंड वाटपाचा निर्णय घेतलेला आहे. सदर कंपनीमार्फत रू.२५० कोटीची गुंतवणुक असून ७५० रोजगार निर्मिती प्रस्तावित आहे. परंतु कार्यवाही थंडबस्त्यात असल्यामुळे येथील येथील युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याने ता याठिकाणी उद्योग सुरू करण्याची मागणी केली आहे.
गोंडपिपरी येथे एमआयडीसी करिता मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहन करण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या पाल्यांना तसेच तालुक्यातील तरूण बेरोजगारांना येथे निर्माण होणाऱ्या उद्योगधंद्यातून मोठ्या प्रमाणात नोकरी मिळणार होत्या. परंतु या परिसरात अद्याप एकही नविन उद्योग आलेला नसल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. सदर एमआयडीसी परीसर हे राष्ट्रीय महामार्ग ३५३ बी ला लागून आहे. त्यामुळे शासनाने येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणामध्ये गोंडपिपरीचा समावेश करून याठिकाणी नवीन उद्योग कारखाने निर्मिती करण्याबाबत निर्णय घ्यावा व याबाबत आपण स्वतः जातीने लक्ष घालून कार्यवाही करण्याची मागणी आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.