महाराष्ट्रात पुन्हा गोध्रा घडवण्याचा डाव..!

0
5

महाराष्ट्रात पुन्हा गोध्रा घडवण्याचा डाव..!

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत द्या

पुणे : सव्वा महिन्याच्या बाळंतीण महिलेला घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली आहे. नवीन गोध्रा घडवण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का? पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला आहे. सरकारने सोमनाथच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच त्याच्या कुटुंबातील एकास सरकारी नोकरीत घेतले पाहिजे. आज भडकवणारे अनेक जण येतील, लोकांनी सावध राहिले पाहिजे, असे आवाहनही वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे. सरकारने 1 कोटी रुपये नुकसान भरपाई आणि घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी. जखमी लोकांना 25 लाख नुकसान भरपाई द्यावी. ही भरपाई पोलिसांकडून वसूल करावी. तरच पोलीस दलातील या अनियंत्रित पोलिसांवर नियंत्रण येईल. परभणीतील पोलीस निरीक्षक घोरबांड याचा इतिहास गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याने समोरासमोर दोन लोकांचा एन्काऊंटर केला आहे.

शिवसेना उबाठा, काँग्रेस, एनसीपी या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी फुले – आंबेडकर यांच्या नावाने मते मागितली, त्यातील एकानेही परभणी पीडितांची भेट घेतली नसल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी निदर्शनास आणून दिले.

परभणी हिंसाचार घटनेवर बोलताना आंबेडकर म्हणाले की, दोन मराठा नेत्यांमधील भांडण आहे, त्यांनीच परभणी प्रकरण चिघळवले आहे. आम्ही सत्यशोधन समिती नेमणार आहोत. त्यातून सर्व बाहेर काढू. परभणीतील सामान्य लोकांचा या बंदला पाठिंबा होता, अनेकांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेणं ही एक फॅशन झाली आहे असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले होते याचा खरपूस समाचार ॲड. आंबेडकरांनी घेतला. अमित शाहचे संसदेतील वक्तव्य RSS ची विचारसरणी दाखवणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वन नेशन, वन इलेक्शन हे बिल 5 वर्षांसाठी निवडून आलेले सरकार कायम राहील हे बघत आहे. त्यामुळे हुकूमशाही येण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही आंबेडकरांनी नमूद केले.

बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर देखील आंबेडकरांनी भाष्य केले. ते म्हणाले की, सरपंच देशमुख यांच्या हत्येमुळे लोकांच्या भावना तीव्र आहेत, सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी. मराठा विरुद्ध वंजारी असे वातावरण चिघळले आहे. सरकारने यातील आरोपींना अटक करावी.

 

मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना भीमा कोरेगाव आयोगापुढे बोलवा

भीमा कोरेगाव चौकशी आयोगापुढे आम्ही अर्ज दिला होता की, मुख्यमंत्री, मुख्य सचिव, यांना आयोगापुढे बोलवा आणि माहिती मागवा की, भीमा कोरेगाव येथे दंगल झाली याची माहिती कधी मिळाली? यावर आम्ही त्यांच्याकडून ही माहिती मागवू, असे आयोगाने म्हटल्याचे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here