विशेष मोहिम राबवत शहर स्वच्छ करा – आ. किशोर जोरगेवार

0
13

विशेष मोहिम राबवत शहर स्वच्छ करा – आ. किशोर जोरगेवार

महापालिका येथे बैठकीचे आयोजन, माजी नगरसेवकांनी मांडल्या तक्रारी

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील स्वच्छता आणि व्यवस्थापनाच्या कामात झालेल्या ढिलाईवर नाराजी व्यक्त करत आमदार किशोर जोरगेवार यांनी महापालिका प्रशासनाला विशेष मोहिम राबवून 15 दिवसांत शहर स्वच्छ करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या हिराई सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांसमोर स्वच्छतेशी संबंधित समस्या मांडत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
शहरातील विविध विषयांना घेऊन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हिराई सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनपा आयुक्त विपिन पालिवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, सहायक आयुक्त अक्षय गडलींग, संतोष गरगेलवार, शहर अभियंता विजय बोरिकर, कार्यकारी अभियंता रवींद्र हजारे, यांत्रिकी उपअभियंता रविंद्र कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता अतुल भसारकर, वैष्णवी रीठे, आशिष भारती, पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सोनू थुल, सहायक अभियंता अमित फुलझले, कनिष्ठ अभियंता सागर सिडाम, आरोग्य विभागाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी नयना उत्तरवार यांच्यासह इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. माजी नगरसेवकही या बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, माजी नगरसेवकांच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. शहरातील नालेसफाई व्यवस्थित होत नाही, कचऱ्याचे ढिगारे उचलले जात नाहीत, आणि कंत्राटदारांचा हलगर्जीपणा वाढत चालला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही स्थिती बदलण्यासाठी माजी नगरसेवकांच्या सहकार्याने एकत्रित काम करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. मला शहर स्वच्छ पाहिजे, आणि त्यासाठी विशेष मोहिम राबवून स्वच्छतेची कामे वेळेत पूर्ण करा, असे स्पष्टपणे त्यांनी सांगितले.
बैठकीत माजी नगरसेवकांनी शहरातील स्वच्छता, नालेसफाई, पथदिवे, रस्त्यांची दुरवस्था आणि पाणीपुरवठा यांसारख्या अनेक मुद्द्यांवर तक्रारी मांडल्या. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. “विशेष मोहिमेच्या माध्यमातून शहरातील सर्व गल्ल्या, रस्ते आणि नाले स्वच्छ करावेत. ही मोहिम 15 दिवसांत पूर्ण झाली पाहिजे. तसेच, कंत्राटदारांच्या हलगर्जीपणाबाबत कारवाई करून जबाबदारी निश्चित करा, असेही ते म्हणाले.
आ. जोरगेवार यांनी पुढील 15 दिवसांत कामाची प्रगती तपासण्यासाठी सहा लोकांची समिती गठित करून त्यांच्या उपस्थितीत पुन्हा आढावा बैठक घेण्याचे सांगितले. आपण प्रामाणिकपणे काम करत माजी नगरसेवकांचे सहकार्य घेतले घेतले तर चंद्रपूर शहर हे आदर्श स्वच्छतेचे उदाहरण बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीनंतर स्वच्छता मोहिमेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आणि संबंधित विभागांना कामाची जबाबदारी सोपवण्यात आली. बैठकीत विविध विकासकामांवर, गटार लाईन, आरोग्य, पोल लाइट इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.

पाणी नाही तर बिल नाही…

अमृत कलश योजना अंतर्गत नळ जोडणी केली आहे, परंतु अनेक भागांमध्ये नळाला पाणी येत नाही. काही भागांत नळाला तोटी लावलेली नाही, त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. या बाबी योग्य नाहीत. त्यामुळे तोटी नसलेल्या नळांना तोटी लावण्यात यावी आणि ज्या नळाला पाणी येत नाही अशा ग्राहकांना नळबिल दिले जाऊ नये, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले.

अमृत 2 योजनेतील दिरंगाई वर नाराजी

बैठकीत अमृत 2 योजनेच्या कामांचा आढावा घेताना काम मंद गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. कामाची गुणवत्ता आणि गती ची पाहण्यासाठी आपण कामची पाहणी करणार असून लवकरच अमृत. 2 च्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेणार असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here