सोंडो सिद्धेश्वर परिसरात रेती माफियांचा धुमाकूळ: प्रशासन उदासीन
राजुरा: राजुरा तालुक्यातील सोंडो सिद्धेश्वर परिसरात अवैध रेती उत्खननाने पुन्हा डोके वर काढले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेचा फायदा घेत रेती माफिया मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी करत आहेत. सिध्देश्वर व सोंडो येथील नाल्यातून मोठ्या प्रमाणावरील अवैध उत्खननामुळे नाल्याच्या परिसंस्थेवर गंभीर परिणाम होत असून, स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
रेती माफियांकडून रात्रीच्या अंधारात व दिवसा ढवळ्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर रेती उपसा केला जातो. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पाण्याच्या स्रोतांवरही परिणाम झाला आहे. या अवैध कारवाया रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
स्थानिकांची प्रतिक्रिया:
परिसरातील ग्रामस्थांनी याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असला, तरी माफियांच्या दबावामुळे व महसूल विभागाच्या आर्थिक मधुर संबंधामुळे बहुतेक जण गप्प राहतात. “अनेकदा तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही. प्रशासनाने त्वरित पाऊले उचलली नाहीत, तर पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम अटळ ठरतील,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.
प्रशासनाची भूमिका:
स्थानिक प्रशासनाने या संदर्भात प्रतिक्रिया देताना आश्वासन दिले आहे की, अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. मात्र, प्रत्यक्षात अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत, यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सोंडो सिद्धेश्वर परिसरातील ही समस्या तातडीने सोडवण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात येथील पर्यावरणावर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.