कळमना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र राम भरोसे…
बल्लारपूर तालुक्यातील कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारत आता फक्त देखाव्यासाठीच आहे की काय असे चित्र दिसून येत आहे. सर्व सामान्य नागरिकांना दिवसा – रात्री आरोग्य सेवा देण्यासाठी शासनांनी करोडे रुपये खर्च करून सुसज्ज इमारत तयार केली. त्यासाठी तज्ञ डॉक्टर व परिचारिका असून त्यांच्यावर लाखो खर्च करण्यात येते. पण डॉक्टर व परिचारीका ह्या नेहमी गायब असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे.
कळमना गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अनेक लहान मोठे अपघात रोजच होत असल्याने रुग्णांना व अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी बल्लारपूर किंवा चंद्रपूर न्यावे लागत असल्याने अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे. दिनांक २४/११/२०२४ रोजी सायंकाळी असाच एक अपघात झाला असता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी एक पण डॉक्टर नसल्याने अपघातग्रस्ताला जीव गमवायची वेळ आल्याने संपूर्ण परिसरात रोष निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांची गैरसोय थांबली नाही तर मोठे आंदोलन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समोर करू अशी माहिती माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, जिल्हा अध्यक्ष आदिवासी टायगर सेना चंद्रपूर यांनी दिली.