विरोधी पक्ष नेत्याच्या सभेला नागरिकांची पाठ!
नांदा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या…
दोन युनियनचा वाद सुभाष धोटे यांना भोवणार का.?
गटातटाच्या राजकारणात काँग्रेस हद्दपार होण्याची शक्यता
कोरपना :- तालुक्यातील नांदा येथे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व राजुरा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. परंतु या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने रिकाम्या खुर्च्या बघायला मिळाल्या.
नांदा येथे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये काम करणारा कामगार वर्ग मोठ्या प्रमाणावर असल्याने या ठिकाणी विजय क्रांती नावाची कामगार संघटना अस्तित्वात असल्याने कामगार मतावर छाप पाडण्याकरिता राजुरा विधानसभेचे उमेदवार सुभाष धोटे यांनी विजय वडेट्टीवार यांची सभा आयोजित केली होती. परंतु या सभेला नागरिकांनी तर सोडा मात्र कामगार वर्गाने सुद्धा पाठ फिरवली असल्याने शंकेला पेव फुटला आहे.
नांदा फाटा परिसरात 1985 पासून अल्ट्राटेक सिमेंट कंपनी स्थापन झाल्याच्या काही वर्षा नंतर इथे एल अँड टी कामगार संघटना स्थापन झाली व त्याचे कायम वर्चस्व राहिले आहे. परंतु मागील दहा वर्षात विजय वडेट्टीवार यांनी या कंपनीतील युनियन मध्ये हस्तक्षेप करून आपली नविन विजय क्रांती ठेकेदारी कामगार संघटना उभारली. त्यामुळे या ठिकाणी दोन कामगार संघटना अस्तित्वात आल्या. एल अँड टी कामगार संघटना ही पुगलिया यांची तर विजय क्रांती ही वडे्टीवार यांची संघटना. दोघेही कट्टर वैरी असल्याने नेहमीच काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला होता हे सर्वश्रुत. दोन्ही कामगार संघटनेत नेहमीच खटके उडाले असून दोन्ही संघटनेचे पदाधिकारी एकमेकांत जुंपल्याचे बघायला मिळते. त्यामुळे ही सभा काँग्रेस उमेदवार सुभाष धोटे यांना भोवणार का.? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे.
तसेच वेळोवेळी सुभाष धोटे यांनी नांदा येथे झालेल्या मतदानावरून पदाधिकारी यांना फटकारले आहे. त्यातल्या त्यात खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यात काही सख्य नाही. तसेच नुकतेच कामगाराच्या इच्छेविरुद्ध जाऊन एल अँड टी कामगार संघटनेने शेतकरी संघटना यांना पाठिंबा दिला. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी यांच्यात वाद होण्याची शक्यता बळावली आहे. या दोन्ही गटातटाच्या राजकारणात नांदा फाटा येथून काँग्रेस हद्दपार होईल का अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे नांदा फाटा येथे विजय वडेट्टीवार यांची ठेकेदारी कामगार संघटना कार्यरत आहे. सभे करिता कामगार वर्ग हजर रहावा त्यासाठी कामावर एक दोन घंट्यानी उशिरा या पण सभेला हजर राहा असा फतवा काढून कामगारांना सभेला उपस्थित ठेवल्याची महिती आहे.