आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ चंद्रपूरात कडाडणार
उद्या शनिवारी सकाळी 10 वाजता कोहिनूर मैदानात जाहीर सभा
चंद्रपूर विधानसभेचे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आणि मित्र पक्षांचे अधिकृत उमेदवार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ भाजपचे स्टार प्रचारक तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या शनिवारी चंद्रपूर दौऱ्यावर असून सकाळी 10 वाजता दादमहल येथील कोहिनूर तलाव क्रीडांगण येथे त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
विधानसभेच्या मतदानाची तारीख जवळ येताच सर्व पक्ष कामाला लागले असून सर्व उमेदवारांनी प्रचारात उडी घेतली आहे. यात भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह ग्रामीण भागातही त्यांनी छोट्या बैठका, नागरिकांशी संवाद अशा माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील पाच वर्षांत केलेली कामे आणि पुढे चंद्रपूरच्या विकासासाठी असलेले त्यांचे व्हिजन ते या बैठकींच्या माध्यमातून सांगत आहेत.
दरम्यान, आता भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चंद्रपूरात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रचारार्थ उद्या शनिवारी येत असून, दादमहल येथील कोहिनूर तलाव मैदानात सकाळी 10 वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून, या सभेला महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.