विरुर वन परिक्षेत्रांतर्गत सिद्धेश्वर मंदिरालगत शेतात बिबट्याचा हल्ला: एका महिन्याच्या वासराचा बळी, वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह
राजुरा: विरुर वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर मंदिरालगतच्या शेत शिवारात मंगळवार, ५ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास अनिल रामगिरवार यांच्या शेतात बिबट्याने एका महिन्याच्या गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला ठार मारले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
शेतकरी आपल्या पिकांचे रक्षण करण्यासाठी रात्रीच्या वेळी जागरण करतात, परंतु वन्य प्राण्यांच्या सतत वाढत्या हल्ल्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. “जर अशा प्रकारच्या हल्ल्यांमुळे जीवित हानी झाली, तर याची संपूर्ण जबाबदारी वन विभागावर राहील,” असे शेतकऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
घटना घडली तेव्हा शेतात उपस्थित असलेले गडी भीमराव पुसाम यांना वासराचा आवाज ऐकू आल्यावर ते बॅटरी घेऊन त्या दिशेने धावले, मात्र त्यांना पाहून बिबट्या पसार झाला. रामगिरवार यांच्या शेतात गोठा असून समोर तलाव आहे, ज्यामुळे बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता अधिक आहे. काही वर्षांपूर्वीही या परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचे अस्तित्व नोंदले गेले होते, परंतु वन विभागाकडून या समस्येवर कोणताही ठोस उपाय योजला गेला नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भीमराव पुसाम यांनी घटनेनंतर तत्काळ वन विभागाला कळवले; परंतु मुख्यालयात कोणीही उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले. शासनाने कर्मचारी मुख्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिलेले असतानाही, हे कर्मचारी राजुरा येथे वास्तव्यास आहेत, यामुळे आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ मदत मिळत नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
घटनेनंतर घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचले नाहीत, परिणामी पंचनामा त्वरित होऊ शकला नाही. अखेर, ६ नोव्हेंबर २०२४ रोजी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून सुरक्षेसाठी कॅमेरे बसवले.
या विलंबामुळे आणि वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. “वन विभागाचे अधिकारी त्यांच्या कर्तव्यात तत्पर आहेत का?” असा सवाल आता नागरिक आणि शेतकरी थेट विचारत आहेत. या घटनेने शासनाने तत्काळ दखल घेतली नाही, तर भविष्यात अधिक गंभीर घटना घडू शकतात, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
या घटनेने वन विभागाच्या कार्यपद्धतीवर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपेक्षित ठोस कारवाईवर सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कोट: इम्पपॅक्ट२४ न्यूज चे संचालक अमोल राऊत यांनी या घटनेची माहिती मिळताच सिद्धेश्वर येथील क्षेत्र सहायक मोहम्मद आमीर शेख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. शेख यांनी घटनेची माहिती देत फक्त त्या दिवशीच ते मुख्यालयी अनुपस्थित असल्याचे सांगितले. त्यांनी पुढे ६ नोव्हेंबर रोजी पंचनामा करून घटनास्थळी कॅमेरा बसवण्यात आल्याचे सांगितले. मात्र, आमच्या संचालकांनी मुख्यालयी कर्मचारी उपस्थित राहतात का?अशी विचारणा केली असता त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही.