डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर
गिरीश गांधी यांना जीवन गौरव, राजेंद्र परतेकींना सेवार्थ सन्मान
चंद्रपूर :
कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार नागपूर येथील माजी आमदार, वनराई चे विश्वस्त, हरित नागपूरचे शिल्पकार व सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांना जाहीर करण्यात आला. समाजकारण, राजकारण, साहित्य, संस्कृती, नाट्य, क्रिडा, पर्यावरण, ग्रामविकास, शिक्षण, पत्रकारिता आदी क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. नक्षलग्रस्त भागात शांततेचा संदेश देणारी लोकयात्रा त्यांनी काढली. वैद्यकिय उपचारासाठी गरजूंना ते सातत्यपुर्ण मदत करतात. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून त्यांनी कार्य केले. कार्यकाळानंतर आमदारकीचे निवृत्ती वेतन घेण्यास नम्रपणे नकार देवून त्यांनी समाजापुढे आदर्श निर्माण केला. वयाच्या ७३ वर्षातही ते सामाजिक चळवळीत उत्साहाने सक्रिय आहे. स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप यांच्याकडून हा पुरस्कार देण्यात येतो. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यकर्त्यासाठी देण्यात येणारा सेवार्थ सन्मान आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील पालडोह येथे गुणवत्तापूर्ण ३६५ दिवस दुर्गम भागात शाळा चालवून जिल्हा परिषदेचा नवा शैक्षणिक पॅटर्न निर्माण करणारे प्रेरणादायी शिक्षक राजेंद्र परतेकी यांना जाहीर करण्यात आला. लाॅकडाऊनच्या काळात त्यांची शाळा सुरू असून अभ्यासक्रमही पुर्ण झाला आहे.
बिबी येथील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर वयाच्या १६ वर्षांपासून तर आजतागायत ३५ वर्षे निशुल्क उपचार करत असून चार लाखांहून अधिक अस्थिरुग्नांना त्यांनी बरे केले आहेत. ग्रामसभेने त्यांना ‘डाॅक्टर’ ही ऐतिहासिक उपाधी दिली. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ सदर पुरस्कार प्रदान केले जातात. २०११ पासून बिबी येथे दिवाळी ही ग्रामस्वच्छता अभियान व फटाकेमुक्त व प्रबोधनात्मक दिव्यग्राम महोत्सवाने साजरी होते. यंदाच्या दिव्यग्राम महोत्सवात १५ नोव्हेंबरला बिबी येथे मान्यवरांच्या हस्ते गिरीश गांधी यांना जीवनगौरव व राजेंद्र परतेकी यांना सेवार्थ सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृपचे स्वागताध्यक्ष संतोष उपरे, संयोजक रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, दीपक चटप, हबीब शेख, सतिश पाचभाई, गणपत तुम्हाणे, संदीप पिंगे, विठ्ठल अहिरकर, प्रमोद विरुटकर, सचिन मडावी, सुकेश ठाकरे, सुरज लेडांगे, आकाश उरकुडे यांनी कळवले आहे.
••••••