पाणीपुरवठा योजनेसाठी सौर ऊर्जेचा अभिनव उपक्रम राबविणार : पालकमंत्री विजय वडेट्टीवार
जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न
मावा, तुडतुडे, बोंडअळी, लाल्या रोगामुळे नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हे पुर्ण करण्याचे निर्देश
राजु झाडे
चंद्रपूर दि.30 ऑक्टोबर, : विद्युत पुरवठ्यातील तांत्रीक अडचणीमुळे पाणीपुरवठ्याच्या विविध योजना बंद पडतात, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेकरिता जिल्ह्यात अभिनव प्रयोग म्हणून दोन ते तीन मेगावॅट उर्जेचा सोलर पॉवर प्रकल्प उभारण्यात येईल असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
नियोजन भवन मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या सभेत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतांना ते बोलत होते. सभेला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, खासदार अशोक नेते, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, नियोजन उपायुक्त श्री. सुपे, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, नियोजन अधिकारी अधिकारी गजानन वायाळ, उपविभागिय अधिकारी रोहन घुगे प्रामुख्याने उपस्थित होते.
कृषी विभागाचा आढावा घेतांना जिल्ह्यातील शेत पिकांवर मावा, तुडतुडे, बोंडअळी, लाल्या या रोगांमुळे धान व कापूस पिकांचे 5 हजार 700 हेक्टर क्षेत्रात आतापर्यंत नुकसान झाले आहे. सर्व नुकसान ग्रस्तांच्या शेतीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळण्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनच नव्हे तर आपत्ती व्यवस्थापन तसेच मदत व पुनर्वसन मंत्री म्हणून जिल्ह्यासाठी मदतनिधी खेचून आणू असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. तसेच पिक विमा कंपन्यांकडूनही तातडीने मदत मिळावी यासाठी लवकरच त्यांचेसमवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी सौर कृषी पंप बंद आहेत, त्यांची दुरूस्ती तात्काळ संबंधीत कंपनीकडून करून घेणे आवश्यक आहे. मात्र कृषीपंप दुरूस्ती करून घेण्याकडे पुरेसे लक्ष देण्यात येत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा नियोजन च्या सर्वसाधारण योजनेत प्राप्त झालेल्या निधीपैकी 50 टक्के निधी कोविड साठी खर्च करण्यात यावे अशा शासनाच्या सूचना असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्र्यांनी विद्युत विभाग, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकाम, सिंचन, आदिवासी विकास, कृषी, आरोग्य, नगरविकास व इतर विभागांचा आढावा घेतला.
नियोजन समितीच्या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता श्रीमती चिवंडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. निवृत्ती राठोड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूरचे प्रकल्प अधिकारी केशव बावनकर, निलय राठोड, नगरविकास विभागाचे विजय सरनाईक, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी रुपेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. सोनुने तसेच संबंधीत अधिकारी प्रामुख्याने उपस्थीत होते.