राजुरा विधानसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडी तर्फे महेंद्रसिंग बबनसिंग चंदेल यांना उमेदवारी जाहीर…
राजुरा :- सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून विविध पक्षाकडून उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात येत आहे. यावेळेस राजुरा विधानसभा क्षेत्रातही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी तर्फे महेंद्रसिंग बबनसिंग चंदेल यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
आजपर्यंत राजुरा विधानसभा क्षेत्रात कोणत्याही पक्षाकडून गोंडपिपरी तालुक्याला उमेदवारीचा मान मिळालेला नाही. मात्र २०२४ मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत सातत्याने उमेदवारी पासून वंचित राहिलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील महेंद्रसिंग चंदेल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली असून गोंडपिपरी तालुक्याला प्रथमच राजुरा विधानसभेची उमेदवारी मिळाली आहे.
महेंद्रसिंग चंदेल हे मिलनसार स्वभावाचे धनी आणि सर्वांना सुपरिचित मृदुभाषी व्यक्तिमत्व असून सध्या ते गोंडपिपरी नगर पंचायत नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत. वंचित बहुजन आघाडीने चंदेल यांना उमेदवारी दिल्याने प्रथमच गोंडपिपरी तालुक्याला उमेदवारीचा मान मिळाला आहे. यामुळे राजुरा विधानसभेची निवडणूक रंगतदार व चुरशीची होणार आहे.
या उमेदवारी मुळे भल्या – भल्यांना घाम फुटला असून गोंडपिपरी तालुक्याला पहिल्यांदा उमेदवारी मिळाल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला व सर्व गट पक्ष सोडून तालुक्यात महेंद्रसिंग चंदेल साठी एकजुटीने प्रयत्न करण्याची भूमिका गोंडपिपरी वासियांची दिसून येत आहे.