देवराव भोंगळे यांना जनतेचा मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांची कोल्हेकुई…
गोमती पाचभाईचे बरळणे तथ्यहीन ; पण बोलविता धणी कोण..?
राजुरा, दि. २३ :- खबरकट्टा लईभारी या युट्यूब चॅनेलवर काल दि. २२ आक्टोंबर २०२४ रोजी चॅनेलच्या प्रमुख गोमती मनोहर पाचभाई यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राजुरा विधानसभेचे निवडणुक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नावाचा उल्लेख करून तथ्यहीन व्हिडिओ टाकून बिनबुडाचे आरोप केले. या व्हिडिओच्या माध्यमातून पाचभाई हिने केलेले विधान व देवराव भोंगळे यांच्या संदर्भातील खोटे मुद्दे म्हणजे घाबरलेल्या विरोधकांची कोल्हेकुई आहे. असे भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
राजुरा विधानसभा मतदारसंघात अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन पद्धतीने बोगस मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. परंतू कोणत्याही तथ्याविणा नेहमीच बरळणाऱ्या स्वयंघोषित पत्रकार गोमती पाचभाई यांनी ‘दादा निघाले बोगस मतदारांच्या भरवशावर आमदार बनायला’ अशा आशयाचा मुखपृष्ठ असलेला व्हिडिओ काल युट्यूबसह अन्य समाजमाध्यमांवर टाकून देवराव भोंगळे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात भाजपच्या वतीने पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली असून गोमती पाचभाईने प्रसिद्धीसाठी कोणत्याही तथ्याविणा देवराव भोंगळे यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असे तक्रारीत म्हटले आहे.
गोमती पाचभाई यांना माझ्या नावाची ॲलर्जी – देवराव भोंगळे
खरंतर, समाजमाध्यमं हे लोकशाहीचे चौथे स्तंभ आहेत अशी भारतीय लोकशाहीची धारणा आहे.
पत्रकार म्हणजे समाजाचा आरसा असे मानून चालणाऱ्या संस्कृतीत आपण वावरतो. त्यामुळे कोणत्याही घटनेकडे डोळस वृत्तीने पाहून तथ्याधारीत लेखन करणे हा कटाक्ष प्रत्येक माध्यमकर्मींनी पाळावा असे वाटते. परंतू खबरकट्टा लईभारी या पोर्टल/चॅनलच्या प्रमुख गोमती पाचभाई यांनी सातत्याने ट्रेक सोडूनच लिखाण केले आहे. भारतीय जनता पक्षाने राजुरा विधानसभा निवडणुक प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली. त्या दिवसापासून ते आजतागायत गोमती पाचभाईंनी सातत्याने माझ्या विरोधात आगपाखड केली आहे. पत्रकार हे समाजमनाचे मत शासनकर्त्यांपर्यंत तसेच नागरीकांपर्यंत पोहचविण्यासाठी दुवा म्हणून काम करतात. त्यांनी न्यायाधीशाची भुमिका घेणे लोकशाहीला धरून नाही. परंतू गोमती पाचभाई यांना माझ्या नावाची ॲलर्जी असावी, त्यामुळेच ते खोटेखाटे आरोप करून प्रसिद्धी झोतात येवू पाहतात. राजुरा विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारीवरून पोलीस योग्य तो तपास करत आहेत. यासोबतच या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आमचीही मागणी आहे. या मतदारसंघात याआधी सुद्धा विशिष्ट समुदायाच्या बोगस मतदारांची नोंदणी काही राजकीय पक्षांनी केली होती. त्यामुळे राजकीय असुरक्षिततेच्या भावनेतून काहींनी पुन्हा तसे केले असल्यास त्यांचेवर निश्चितपणे कठोर कारवाई केली गेली पाहिजे. परंतू या बोगस मतदार प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नसतांना सुद्धा हेतुपरस्पर माझे नाव जोडून गोमती पाचभाई यांना कोणता असुरी आनंद मिळतो हे त्यांना व त्यांच्या बोलविता धण्यांना ठाऊक? असा चिमटा देवराव भोंगळे यांनी प्रत्युत्तरातून काढला आहे.
देवराव भोंगळे यांनी विधानसभा निवडणुक प्रमुख म्हणून कार्यरत होताच राजुरा मतदारसंघ पिंजून काढला. भाजपच्या संघटनात्मक बांधणीपासून लोकसेवेचे शेकडो उपक्रम त्यांनी यशस्वीरीत्या या मतदारसंघात सातत्याने घेतले. पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नावाने राजुरा, गोंडपिपरी, गडचांदूर, कोरपना, जिवती व विरूर स्टे. याठिकाणी सेवा केंद्र काढून ते जनसामान्यांना मोफत सेवा व माहीती देतात. भव्य महाआरोग्य शिबीरांचे आयोजन करून गोरगरीबांना निःशुल्क तपासणी व शस्त्रक्रिया देण्याचा नवा विक्रम त्यांनी या मतदारसंघात केला. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरता त्यांनी मतदारसंघात भव्य महिला सन्मान मेळावे घेऊन महिलांमध्ये जनजागृती केली. स्वच्छ प्रतिमा व कार्यतत्परता या गुणांमुळे ते विधानसभेत लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे देवराव भोंगळे हे हितशत्रू तसेच विरोधकांच्या अवघड जागेचे दुखणं ठरत आहेत. असे सांगून खबरकट्टा लईभारीने काल प्रसारीत केलेल्या व्हिडिओतील शब्द जरी गोमती पाचभाई यांचे असले तरी त्यांचा बोलविता धणी कोण..? हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असा सवाल ही प्रसिद्धी पत्रकातून विचारला आहे.