पवित्र दीक्षाभूमी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा लाखो अनुयायांची स्वप्नपूर्ती : आ. किशोर जोरगेवार
५६ कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून होणार कायापालट, भूमिपूजन सोहळा संपन्न
आपण दिक्षाभूमीच्या विकास कामाच्या भूमिपूजनासाठी एकत्र आलो आहोत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे हे पवित्र स्थान, केवळ चंद्रपूरचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहे. आज आपण या विकास कार्याच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना आणखी पुढे नेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत. माझ्यासह लाखो अनुयायांनी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत असून दिक्षाभूमी विकास कामाचा भूमिपूजन सोहळा लाखो अनुयायांची स्वप्नपूर्ती असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. निवडून आल्यावर पहिल्याच अधिवेशनात त्यांनी दिक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. या कामासाठी त्यांनी पहिल्या टप्यात ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, मुंबई प्रदेश भिक्खु संघ भन्ते विनयबोधी महाथेरो, महाराष्ट्र भिक्खू संघाचे पंडितराम महासी विपश्यना केंद्र सचिव भन्ते डॉ. सुमनवण्णो महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटक वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला प्रमुख सविता दंढारे, सायली येरणे, विमल कातकर, निलिमा वनकर, युवा नेते अमोल शेंडे, राशिद हुसेन, जितेश कुळमेथे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “चंद्रपूर दिक्षाभूमीचा विकास ही गरज केवळ येथे येणाऱ्या पर्यटकांकरिता नसून येथील प्रत्येक नागरिकासाठी आहे. दिक्षाभूमीच्या माध्यमातून चंद्रपूरला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्याचा आपला संकल्प आहे. म्हणूनच, येथील परिसराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करणे हे माझे ध्येय आहे. या प्रयत्नांतूनच ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून विविध पायाभूत सुविधा निर्माण करणार आहोत, ज्यामध्ये परिसराचे सौंदर्यीकरण, विश्रामगृहे, ग्रंथालये,, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक तसेच पाणी व स्वच्छतेच्या सोयींचा समावेश असणार आहे.”
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ज्ञान, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची शिकवण दिली आहे. दिक्षाभूमीच्या विकासाच्या माध्यमातून आपण त्यांच्या शिकवणीला सन्मान देणार आहोत. यात केवळ जागतिक स्तरावरच्या सोयी-सुविधा नसून, येणाऱ्या भाविकांसाठी शांती व शांतता मिळविण्याची जागा तयार करणार आहोत. दिक्षाभूमीचे हे काम तातडीने आणि उत्तम दर्जात पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आपण दिलेल्या या पाठिंब्यामुळेच मला पुढे जाण्याची ऊर्जा मिळत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.