रामपूर परिसरातील दोन बिअर बारवर इम्पॅक्ट 24 न्यूजचा दणका
राज्य उत्पादन शुल्क विभागाची जोरदार कारवाई
राजुरा: रामपूर परिसरातील दोन बिअर बारवर परवा प्रकाशित झालेल्या इम्पॅक्ट 24 न्यूजच्या बातमीचा जोरदार परिणाम दिसून आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी (दि. 23) गुप्त माहितीच्या आधारे दोन बिअर बारमध्ये धाड टाकली. या कारवाईत ठरवलेल्या वेळेपूर्वीच छुप्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचे उघडकीस आले. यानंतर दोन्ही बिअर बार मालकांवर महाराष्ट्र विदेशी मद्य नियम 1953 चे नियम 49, 53, 55 आणि 58 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
*राज्य उत्पादन शुल्क विभागाची तत्काळ प्रतिक्रिया*
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अभिनंदन कांबळे हे नियमित पेट्रोलिंग करत असताना रामपूर परिसरातील बिअर बारमध्ये वेळेपूर्वीच छुप्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर, त्यांच्या नेतृत्वात सहाय्यक दुय्यम निरीक्षक जगदीश कापटे आणि जवान दिलदार रायपुरे यांच्या सहकार्याने या बारवर कारवाई करण्यात आली.
*बार मालकांना कडक इशारा*
या कारवाईनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक नितीन धार्मीक यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जिल्ह्यातील सर्व बिअर बार चालकांनी ठरवलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.”
राजुरा राज्य उत्पादन शुल्क उपविभाग निरिक्षक अभिनंदन कांबळे यांनी आपल्या प्रतिक्रियेत ठाम सांगितले आहे की,”या नंतर कुठल्याच नियमबाह्य अनुज्ञप्तीना माफ केले जाणार नाही आणि चूक आढळल्यास कठोर कारवाई करू”
इम्पॅक्ट 24 न्यूजचा दणका
इम्पॅक्ट 24 न्यूजने या कारवाईचे महत्त्व अधोरेखित करत, सरकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा प्रकारांवर तात्काळ लक्ष केंद्रित केले आहे. यामुळेच बिअर बारवरील कारवाई झाली असून, इम्पॅक्ट 24 न्यूजने समाजासमोर अशा गैरप्रकारांवर प्रकाश टाकण्याचे कार्य सुरूच ठेवले आहे.