राजुरा तालुक्यातील भेदोडा येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाइपलाइन कामावर गंभीर आरोप
अमोल राऊत
राजुरा- वंचित बहुजन आघाडी तालुका महासचिव सतीश कांबळे यांनी भेदोडा ग्राम पंचायत हद्दीत सुरू असलेल्या जल जीवन मिशन पाइपलाइन प्रकल्पातील भोंगळ कारभारावर गंभीर आरोप केले आहेत.शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्चून उच्च प्रतीचे काम व्हावे व नागरिकांना निर्मल जल मिळावे या उदात्त हेतूने ही योजना राबविली जाते.पण कांबळे यांनी कंत्राटदार संजय फरकडे, ग्रामपंचायत सरपंच, इंजिनिअर आणि सचिव यांच्यावर कामातील त्रुटींवर बोट ठेवले आहे.
कांबळे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, मात्र रस्त्यांवर खोदलेले खड्डे अजूनही बुजवलेले नाहीत. यामुळे नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे गाड्या स्लिप होत असून, यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारू शकत नाही. तसेच, कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पाइपलाइनसाठी केलेल्या खोदकामात काँक्रेटीकरण सारख्या अनेक चुका दिसून येत असून, स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली आहे.
कांबळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले असून, कामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.