पोळा हा सण पिढ्यांपर्यंत पोहोचणारी संस्कृती आणि परंपरा – आ. किशोर जोरगेवार
विविध ठिकाणी तान्हा पोळा कार्यक्रमांचे आयोजन
आपल्या भारतीय संस्कृतीत पोळ्याचा सण हा शेतकऱ्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आज आपण तान्हा पोळा साजरा करत आहोत, आपल्या पुढच्या पिढीला या सणाचे आणि बैलांचे महत्त्व कळावे, त्यांच्याप्रती आदर निर्माण व्हावा, यासाठी आपण हा सण साजरा करत असून पोळा म्हणजे केवळ सण नाही तर ही एक पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचणारी संस्कृती आणि परंपरा असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
तान्हा पोळा निमित्ताने चंद्रपूरातील इंदिरा नगर, कृष्णा नगर, संजय नगर, तुकुम, बाबूपेठ, आकाशवाणी या वार्डांमध्ये विविध ठिकाणी नंदीबैल सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांना आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, पोळा हा सण शेतकरी बांधवांना समर्पित आहे. तर दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा बालगोपालांसाठी शेती संस्कृतीचे दर्शन घडविणारे पर्व आहे. आपले पारंपरिक उत्सव हे आपली संस्कृती दर्शवणारे आहेत. त्यांचे जतन केले पाहिजे. तान्हा पोळा बहुतेक लहान मुलांच्या विरंगुळ्यासाठी साजरा करण्याची प्रथा आहे. आपण या दिवशी आपल्या लहान मुलांना लाकडी बैल सजवून देतात. त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे.
मात्र या उत्सवामुळे लहान मुलांमध्येही बैल या पशुधनाबाबत माहिती होऊन महाराष्ट्रीयन संस्कृती जपली जाते. हाच तान्हा पोळा साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते यावेळी म्हणाले. शेतीचे महत्त्व आणि बैलांच्या साह्याने होणाऱ्या मेहनतीचे मूल्य आपण या उत्सवातून नव्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. आपण या परंपरेचा आदर ठेवून, आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टांचे महत्त्व समजून घेऊन पुढील पिढ्यांमध्येही हा सण तितक्याच उत्साहाने आणि आदराने साजरा करण्याचा संकल्प या दिवशी करण्याचे आवाहन यावेळी बोलताना आ. जोरगेवार यांनी केले.
यावेळी लहान बालके शेतकऱ्याची वेशभूषा धारण करून आपल्या नंदीबैलाची सजावट करत या स्पर्धेत सहभागी झाले होते. अनेकांनी यावेळी सजावटीच्या माध्यमातून अनेक सामाजिक गोष्टींकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या सर्वांना आमदार किशोर जोरगेवार यांनी ‘अम्मा का टिफीन’ भेट स्वरूप दिला. या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.