पूराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करून तात्काळ मदत करा – आ. किशोर जोरगेवार
नुकसानग्रस्त भागातील शेतीची अधिकाऱ्यांसह पाहणी, 12 हजार हेक्टर शेती पाण्याखाली
वर्धा, नांदेड, आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीला पूर आला आहे. या पुरपरिस्थितीमुळे नदीलगतच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरले असून, त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज, मंगळवारी, आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून नुकसान झालेल्या शेतीचे भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करून तात्काळ अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. पिक विमा कंपनीने तत्काळ शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी नायब तहसीलदार राजू धांडे, कृषी अधिकारी अंकित माने, मंडळ अधिकारी विशाल कुरेवार, मंडळ अधिकारी किरण मोडकवार, तलाठी खरात, तलाठी मनोज शेंडे, मारडा चे सरपंच गणपत चौधरी, माजी सरपंच गणपत कुळे, प्रवीण पिंपळशेंडे, चंदू मातणे, संजय महाकालीवार आदींची उपस्थिती होती.
मागील काही दिवसांपासून चंद्रपूर लगतच्या वर्धा, यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचा परिणाम चंद्रपूरात दिसून येत असून वर्धा नदीला पूर आला आहे. या पूरामुळे अनेक शेतींमध्ये पूराचे पाणी जमा झाले आहे. दरम्यान, आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मारडा आणि पिपरी येथील नुकसानीची अधिकाऱ्यांसह पाहणी केली आहे. या पावसाच्या पाण्यामुळे जवळपास 12 हजार हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. १ हजार ५ शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून सोयाबीन, कापूस, मिर्ची आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पाहणीदरम्यान, आ. किशोर जोरगेवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. आ. जोरगेवार म्हणाले की, “शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण होऊन त्यांना मदतीचा दिलासा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.” शासनाने या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना त्वरित मदत करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या पाण्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतीचे पंचनामे त्वरित करण्यासाठी एक स्वतंत्र पथक तयार करण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून निघावे आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी यासाठी शेतपिकांच्या नुकसानाचे योग्य मूल्यमापन करून अहवाल तयार करण्यात येईल, असे शेतकऱ्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी आश्वस्त केले आहे.