अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे गडचांदूर येथे सुरू असलेले कार्य प्रशंसनीय – डॉ. प्रवीण येरमे
गडचांदूर: अल्कोहोलिक ॲनॉनिमसचा एक भाग असलेल्या ‘ज्ञान समूह’चा तृतीय वर्धापन दिन सोहळा आणि जनजागृती कार्यक्रम 12 ऑगस्ट, सोमवार रोजी मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय गडचांदूरचे वैद्यकीय अधिकारी मा. डॉ.प्रवीण येरमे आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमात सन्माननीय नागरिकांचाही मोठा सहभाग होता.
या प्रसंगी, डॉ. प्रवीण येरमे यांनी अल्कोहोलिक ॲनॉनिमसचे गडचांदूर येथे सुरू असलेले कार्य खूपच प्रशंसनीय असल्याचे सांगितले. त्यांनी यावर भाष्य करताना म्हटले की, “हे कार्य असेच निरंतर सुरू राहावे, जेणेकरून मद्यपानामुळे समाजात बदनाम झालेल्या व्यक्तींच्या विषयी समाजात प्रेम व करुणा निर्माण होईल.” त्यांच्या या प्रेरणादायी शब्दांनी ‘ज्ञान समूह’च्या सभासदांना नवी ऊर्जा मिळाली.
डॉ.श्रीनिवास सोनटक्के देखील आपले विचार व्यक्त करताना म्हटले की, “दारुड्या, बेवडा अशा समाजात लागलेल्या कलंकातून मद्यपी व्यक्तीला मुक्त करण्याचे कार्य अल्कोहोलिक ॲनॉनिमसच्या माध्यमातून शक्य आहे.”
अल्कोहोलिक ॲनॉनिमस ही एक जागतिक संस्था आहे, जी मद्यपानाची समस्या असलेल्या आणि दारू सोडण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींना मदत करते. या संस्थेचे वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही प्रकारची वर्गणी किंवा फी आकारली जात नाही. या संस्थेच्या मदतीने अनेक सभासदांनी आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन सुखी आणि आनंदी केले आहे.
‘ज्ञान समूह’च्या नियमित सभा सोमवार व गुरुवार सायंकाळी 7 ते 8 या वेळेत सावित्रीबाई फुले महाविद्यालय, गडचांदूर येथे आयोजित केल्या जातात. या सभांचा लाभ घेण्यासाठी सर्व मद्यपीडित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी व्हावे आणि निर्व्यसनी जीवन जगावे, असे आवाहन ‘ज्ञान समूह’च्या सर्व सभासदांनी केले आहे.