चंद्रपूरमध्ये महायुतीच्या अंतर्गत कुरघोळीत कामगारांचा बळी जाऊ देणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते बंडू नगराळे यांनी दिला आहे
महानिर्मितीच्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगराळे यांनी हे वक्तव्य केले…
अमोल राऊत
चंद्रपूर: महायुती सरकारचे समर्थक आमदार जोरगेवार यांनी कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपुरात बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फडणवीसांनी कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शिंदे गटाला श्रेय मिळू नये यासाठी महायुतीतील अंतर्गत कुरघोळीमुळे कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, असे नगराळे यांनी स्पष्ट केले.
चंद्रपूर येथील मेजर स्टोअर गेटवर गेल्या आठ दिवसांपासून कंत्राटी कामगारांचे आमरण उपोषण सुरू आहे. फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनापासून माघार घेतल्यामुळे कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कामगारांच्या कृती समितीचे पदाधिकारी हे आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत आहेत.
26 ऑगस्ट रोजी कामगारांनी आमदार जोरगेवार, नगराळे, आणि गोंगपाचे सयाम यांना पाठिंब्यासाठी पाचारण केले होते. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आंदोलनाला भेट दिली आणि त्यांना पाठिंबा दिला. यावेळी जोरगेवार यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. नगराळे यांनी यापूर्वी चंद्रपूरमध्ये कामगारांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते आणि त्या वेळी पॉवर स्टेशन बंद करून कामगारांना न्याय मिळवून दिला होता.
नगराळे यांच्या अनुभवामुळे आणि जोरगेवार यांच्या आश्वासनामुळे कामगारांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.