लाडक्या बहिणींना सक्षम, आत्मनिर्भर, आणि स्वाभिमानी बनविण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

0
122

लाडक्या बहिणींना सक्षम, आत्मनिर्भर, आणि स्वाभिमानी बनविण्याचा संकल्प – आ. किशोर जोरगेवार

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन, हजारो बहिणींनी आ. जोरगेवार यांना बांधली राखी

 

रक्षा बंधन हा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे, विश्वासाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे. बहिण आपल्या भावाला राखी बांधते, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुख-समृद्धीसाठी आणि त्याच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटातून त्याचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करते. आणि भाऊ आपल्या बहिणीचे जीवनभर रक्षण करण्याचे वचन देतो. भाऊ म्हणून तुमचे रक्षण करणे हे तर आमचे कर्तव्य आहेच, सोबतच आपल्या लाडक्या बहिणींना सक्षम, आत्मनिर्भर, आणि स्वाभिमानी बनविण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राजीव गांधी सभागृह येथे रक्षा बंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला श्री माता महाकाली महोत्सव समितीचे सचिव अजय जयस्वाल, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर संघटिका सविता दंढारे, अल्पसंख्याक विभागाच्या महिला शहर प्रमुख कौसर खान, सायली येरणे, बहुजन विभाग विमल कातकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. अनेक गरजू भगिनींना संघटनेच्या माध्यमातून मदत मिळाली आहे. ‘अम्मा का टिफिन’ उपक्रमातही यंग चांदा ब्रिगेडच्या महिला विभागाचे मोठे योगदान आहे. रस्ते, नाली, मोठ्या इमारती तयार करणे म्हणजेच विकास ही आपली संकल्पना नाही. हे विकास कार्य होत आहेत आणि पुढे पण होत राहतील. मात्र मतदारसंघातील माझ्या लाडक्या बहिणींना स्वयंरोजगारातून आत्मनिर्भर बनविण्याचा संकल्प आपण केला आहे. मागील दोन वर्षांत आपण शहरातील प्रत्येक प्रभागात विविध प्रशिक्षण शिबीर घेत त्यांना प्रशिक्षित केले आहे. यात ब्युटी पार्लर, हेअर कटिंग, मेकअप, शिवणकाम, फॅशन डिझाईन यासारखे महागडे प्रशिक्षण आपण महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. यातून शेकडो महिलांनी स्वतःचा रोजगार उभा केला आहे. पुढेही आपण असे उपक्रम राबवून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
आजच्या युगात आपल्या बहिणींना सक्षम, आत्मनिर्भर, आणि स्वाभिमानी बनविणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. समाजाच्या विविध स्तरांवर स्त्रियांना आत्मनिर्भर बनवणे हे केवळ त्यांच्यासाठीच नाही, तर संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. आपल्या बहिणींना शिक्षण, योग्य संधी, आणि समर्थन देऊन आपण त्यांना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी सक्षम करू शकतो. स्वाभिमान हा आपल्या बहिणींच्या व्यक्तिमत्त्वाचा आधारस्तंभ आहे. स्वाभिमानाने भरलेली स्त्री कोणत्याही परीक्षेत यशस्वी होऊ शकते आणि आपल्या जीवनात स्वतंत्रपणे पुढे जाऊ शकते. हा दिवस फक्त राखी बांधण्याचा नाही, तर आपल्या बहिणींना एक नवा आधार, एक नवी दिशा, आणि एक नवा आत्मविश्वास देण्याचा असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी हजारो लाडक्या बहिणींनी आमदार किशोर जोरगेवार यांना राखीचा पवित्र धागा बांधला. आमदार किशोर जोरगेवार यांनीही भेट वस्तू देत बहिणींच्या मागे उभे राहणार असा शब्द दिला. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांसह हजारो महिलांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here