राजुरा: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील विहीरगाव आणि पंचाळा परिसरात अवैध रेती साठा करून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गावातील प्रत्येकाला या धंद्याची कल्पना असून, हा गोरखधंदा खुलेआम चालू आहे. मात्र, प्रश्न असा आहे की, ज्याला सर्वजण पाहत आहेत, ते प्रशासनाच्या नजरेत का येत नाही?
अवैध रेती साठा करून हायवा गाड्यांद्वारे ती रेती विक्रीसाठी बाजारात नेली जात आहे. या धंद्याने गावातील पर्यावरणाची हानी होत आहे, पाण्याची पातळी खोल जात आहे, आणि भविष्यात या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणा संघर्ष करावा लागेल. प्रशासन हे सर्व पाहूनही गप्प का आहे?
तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या डोळ्यांत हे सर्व कधी येईल? की कोणाचा जीव गेल्यावरच हे जागतील? या सर्वांनी काही ठोस पाऊल उचलल्याशिवाय रेती चोरी थांबणार नाही, आणि खनिज संपत्तीच्या विनाशाला आळा बसणार नाही. काय, आता कुठल्या मुहूर्ताची वाट पाहत आहेत हे अधिकारी?
जनतेचा रोष आणि पर्यावरणाची हानी या दोन गोष्टींनी गावातील स्थिती बिकट केली आहे. आता नागरिकांनी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने जागे होऊन तात्काळ कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल.
कोट: संबंधीत साजा हा गेडेकर मॅडम तलाठी विहीरगाव यांच्या हद्दीत येत असुन आमच्या संचालकांनी त्यांना रेती तस्करी संबंधीत विचारणा करायसाठी ३ वेळा भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल उचलला नाही किंव्हा परत कॉल सुद्धा केला नाही.