चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महविद्यालय येथे विषशोध पडताळणी यंत्रणा उपलब्ध करा – आ. किशोर जोरगेवार
विषशोध यंत्रणेच्या पडताळणी बाबत समिती घोषित करण्याची मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
विष प्राशन केलेल्या रुग्णाने नेमके कोणते विष प्राशन केले याची पडताळणी करणारी विषशोध यंत्रणा चंद्रपूरातील शासकीय वैद्यकीय महविद्यालय येथे नाही. त्यामुळे उपचार करताना डॉक्टरांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेता चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महविद्यालयात विषशोध पडताळणी यंत्रणा (टॉक्सिकोलॉजी सेंटर) उपलब्ध करा, अशी मागणी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
सदर मागणीवर उत्तर देताना विष शोध पडताळणी यंत्रणेच्या पडताळणी बाबत समिती घोषित करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, १४ कोटी लोकसंख्येच्या राज्यात केवळ मुंबई, पुणे, नागपूर आणि छ. संभाजीनगर या सहा शहरात टॉक्सिकोलॉजी सेंटर आहे. राज्यात हजारो विषबाधेची प्रकरणे येत असताना विषबाधेचा प्रकार शोधणारे सेंटर केवळ चार शहरात आहे. त्यामुळे चंद्रपूरसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात टॉक्सिकोलॉजी सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलताना केली आहे. यावर उत्तर देताना याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश देणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले असून विषशोध पडताळणी यंत्रणेबाबत समिती घोषित करण्याची घोषणा केली आहे.